नगर : झेडपीच्या 239 केटीवेअरचा सर्व्हे! अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी लांगोरे यांच्या सूचना; प्रशासन ‘अ‍ॅक्शन मोड’मध्ये

July 25, 2022 0 Comments

https://ift.tt/eEi9QbZ

नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यामध्ये अनेक भागात शेती आणि पिण्याचा पाणीप्रश्न भेडसावत असतो. अशा परिसरात शाश्वत पाणी उपलब्ध करून देण्यासाठी भूगर्भातील आणि भूपृष्ठावरील पाणीसाठ्याचे योग्य नियोजन गरजेचे आहे. झेडपीच्या लघू व पाटबंधारे विभागाच्या माध्यमातून जलसाठ्यांमध्ये वृद्धी करण्याची अभिनव मोहीम हाती घेण्यात आली आहे. यामध्ये जिल्ह्यातील तब्बल 239 केटीवेअरचा सर्र्व्हेे करून गेट दुरुस्ती आणि गाळ काढून पाणीसाठ्यात वाढ करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय नुकताच झेडपीतून घेण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेमध्ये गेल्या आठवड्यात सीईओ आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांनी लघू व पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग गायसमुद्रे यांच्यासह अन्य प्रमुख अधिकारी व पदाधिकार्‍यांसमवेत चर्चा केली. यावेळी लांगोरे यांनी सध्याचा पावसाळा, पावसाचे वाहून जाणारे पाणी, पाझर तलावाची परिस्थिती, केटीवेअरची अवस्था इत्यादी बाबत अधिकार्‍यांकडून आढावा घेतला. यामध्ये काही केटीवेअरचे गेट खराब झाले आहेत, काही गायब आहेत, काही ठिकाणी नवीन गेटची गरज असल्याचे समोर आले. त्यामुळे लांगोरे यांनी याबाबत सीईओंशी चर्चा करून तत्काळ लघू व पाटबंधारे अधिकारी आणि कर्मचार्‍यांना सर्वच केटीवेअरचा सर्व्हे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या.

जिल्ह्यात कार्यकारी अभियंता गायसमुद्रे हे 17 शाखा अभियंता आणि 28 कर्मचार्‍यांकरवी 239 केटीवेअरचा सर्व्हे करत आहेत. यामध्ये किती केटवेअरचे गेट खराब आहे, किती ठिकाणी नवीन गेट टाकायचे आहे, याबाबतचा अहवाल पुढे येणार आहे.

गाळ काढण्यासाठी लोकसहभागाचे आवाहन
लांगोरे यांनी केटीचे नादुरुस्त असलेली गेट तत्काळ दुरुस्तीच्या सूचना केल्या आहेत. शिवाय तलावातील गाळ काढून पाणीसाठ्यात वाढ करण्यासाठीही परिसरातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था, सहकारी संस्थांनी याकामी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

सप्टेंबरपर्यंत तयारी; ऑक्टोबरला अ‍ॅक्शन

जिल्ह्यातील सर्व केटीवेअरचे गेट सप्टेंबरच्या आत दुरुस्ती करण्यात येणार आहे. याशिवाय गाळ काढण्याचेही कामही पूर्ण होईल, असा अंदाज आहे. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये सर्व केटींचे गेट टाकले जातील, त्यातून निश्चितच पाणी साठवण होऊन पाझराव्दारे परिसरातील विहिरी, बोअरवेल्सच्या माध्यमातून शेकडो हेक्टरचा पाणीप्रश्न मार्गी लागेल.

केटीतील पाणीसाठ्यात वाढ होणार!
साधारणतः केटीवेअरचे 15 ते 25 मीटर पात्र आणि 7 मीटर पर्यंत खोली असते. 250 ते 300 मीटर पाणी साठवत होते. एका केटीत सुमारे 0.50 ते 0.60 दलघफू पाणी साठवण करता येते. मात्र, गेटची दुरुस्ती केल्यास ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा उद्देश साध्य होणार आहे. तत्पूर्वी प्रत्येक केटीमध्ये किमान 0.10 दलघफू पाणीसाठा वाढेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

85 बंधार्‍यांची कामे मंजूर, 50 पूर्ण!
जिल्ह्यात पावसाचे पाणी साठविण्यासाठी जिल्हा परिषदेने यापूर्वीही अनेक पाझर तलाव, केटीवेअर उभारलेले आहेत. आता 50 साठा बंधारे आणि 35 केटीवेअर जिल्ह्यासाठी मंजूर झालेले आहेत. यातील 50 पेक्षा अधिक कामे पूर्ण झाली असून 35 कामे प्रगतिपथावर आहेत. याशिवाय मुख्यमंत्री जलसंवर्धन विभागातून 700 दुरुस्तीची कामे मंजूर असून, याबाबत निधी कधी मिळणार, याकडे लक्ष असणार आहे.

‘बंदिस्त’चा निधी हा उत्तम पर्याय!
15 व्या वित्त आयोगातून जिल्ह्यातील 1316 ग्रामपंचायतींना तब्बल 50 कोटींचा निधी मिळाला आहे. हा निधी खर्च करताना पाणीप्रश्नावर करण्याच्या विशेष सूचना आहेत. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतींनी या निधीचा योग्य विनियोग करताना गेटची दुरुस्ती असेल किंवा गाळ काढण्यासाठीही पुढाकार घेतला तर गावोगावचा पाणीप्रश्न मार्गी लागणार आहे.

The post नगर : झेडपीच्या 239 केटीवेअरचा सर्व्हे! अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी लांगोरे यांच्या सूचना; प्रशासन ‘अ‍ॅक्शन मोड’मध्ये appeared first on पुढारी.



from अहमदनगर Archives | पुढारी https://ift.tt/Opzmk4t
via IFTTT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: