Legislative Council Elections :…आता चमत्कार कुणाबाबत घडतोय, हे अवघा महाराष्ट्र बघेल – अजित पवारांचं विधान

June 19, 2022 0 Comments

राज्याची विधानपरिषद निवडणुकीस अवघे दोन दिवस शिल्लक असून, २० जून रोजी मतदान आहे. या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारपरिषद घेत, महाविकास आघाडीच्या तयारीबाबत माहिती दिली. तसेच, चमत्कार कुणाच्याबाबत घडतोय हे उभा महाराष्ट्र सोमवारी बघेल, असं विधानही यावेळी त्यांनी केलं. शिवाय महाविकास आघाडीचे सर्व सहा उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं.

उस्मानाबाद जिल्हयातील भाजपाच्या पदाधिकार्‍यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यावेळी अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.

उपमुख्यंत्री अजित पवार म्हणाले, “विधानसभेच्या सदस्यांमधून दहा विधानपरिषदेचे सदस्य निवडून देण्याची निवडणूक लागली आहे, ११ उमेदवार उभे आहेत. साधारण चार पक्षाचे उमदेवार निवडणुकीसाठी उभे आहेत. महाविकासआघाडी म्हणून आम्ही सहा उमेदवार उभा केलेले आहेत. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांचे प्रत्येकी दोन उमेदवार आहेत. मागील दोन दिवस मी विविध बातम्या पाहतोय, मी स्पष्टपणे नमूद करू इच्छितो की आम्ही सगळेजणं हे उमेदवार निवडून आणण्यासाठी मनापासून प्रयत्न करतोय.”

…आणि त्याची किंमत शेवटी मोजावी लागते –

तसेच, “एक गोष्ट खरी आहे की शिवसेनेकडे दोन उमेदवार निवडून आणण्यासाठी पुरेसे मतं आहेत. आमच्या दोन सदस्यांना अजूनही मतदान करण्याची परवानगी न्यायालयाने न दिल्याने आमची संख्या ही ५१ आहे. कोटा साधारण २६ चा आहे. अगदी काठावर धरून चालत नाही, कारण कालच्या राज्यसभा निवडणुकीत काय घडलं हे अवघ्या महाराष्ट्राने पाहीलेलं आहे. त्यामुळे यदाकदाचित एखादं मतं दिलेलं बाद झालं, काही तिथे अडचण आली, सभागृहात मतदान करत असताना कधी काय होईल सांगता येत नाही. कधी नजरचुकीने देखील एखादी गोष्ट घडून जाते आणि त्याची किंमत शेवटी मोजावी लागते. जसं मागील वेळेस एका शिवसेनेच्या सदस्यांस आमदार म्हणून दिलेलं मत हे बाद ठरवण्यात आलं. म्हणून आम्ही सगळेजण काळजी घेतोय, कोटा जास्त कसा देता येईल याबद्दलचा प्रयत्न करतोय.” असं यावेळी अजित पवारांनी सांगितलं.

…त्यामुळे तो चमत्कार तर घडणारच आहे –

याचबरोबर, “चमत्कार होईल की आणखी काय होईल ते सगळं दिसेलचं. ११ पैकी १० निवडून येणार आहे एक जण पराभूत होणार आहे, त्यामुळे तो चमत्कार तर घडणारच आहे. आता चमत्कार कुणाच्याबाबतीत घडतोय ते उभा महाराष्ट्र सोमवारी बघेल. सर्व जागा निवडून आणण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करते आहे. जे २६ चा आकडा गाठायला कमी पडतील त्याची विकेट जाईल.” असंही यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बोलून दाखवलं.

अपक्षांना काहींनी फोन केलं हे खरं –

तर “अपक्षांकडे सन्मानाने मतं मागितली पाहिजेत. अपक्षांना काहींनी फोन केलं हे खरं आहे. मी स्वत: अनेकांना फोन केले. अशोकराव, बाळासाहेबांनी अनेकांना फोन केले. पहिलं आणि दुसरंच मत महत्वाचं नाही, तर तिसरा, चौथा आणि पाचवा क्रमांकही महत्वाचा असतो त्यासाठी आमचा प्रयत्न आहे. एक आणि दोन एकमेकांना दिल्यानंतर तीन आणि चार बद्दल आम्ही ठरवू. आम्हाला थोड्या मतांची गरज आहे. मी, जयंत पाटील, भुजबळ आम्ही सर्व चर्चा करत आहोत.” अशी देखील माहिती अजित पवारांनी यावेळी दिली.

हा निर्णय केंद्रसरकारने अगोदरच घ्यायला हवा होता … –

“ ‘अग्निपथ’ वरुन अनेक राज्यात तरुण रस्त्यावर उतरून जाळपोळ करत आहेत. ही योजना जाहीर करताना केंद्राने वयाचा निर्णय घेतला नव्हता, मात्र तरुणांचा संताप लक्षात घेता वयाच्या अटीमध्ये केंद्रसरकारने बदल केला आहे. हा निर्णय केंद्रसरकारने अगोदरच घ्यायला हवा होता, म्हणजे हा रोष वाढला नसता.” असा टोलाही अजित पवारांनी लगावला. तसेच, “तरुणांनी राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करु नये. करोना काळात अनेक रोजगार गेले आहेत त्यामुळे तरुणांच्या भावना आम्ही समजून आहोत.” असेही अजित पवार म्हणाले.



https://ift.tt/snjzK43

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: