मोसमी पावसाची अजूनही प्रतीक्षाच ; विदर्भासह राज्यभर तीव्र काहिली

June 06, 2022 0 Comments

पुणे : राज्याला नैर्ऋत्य मोसमी पावसाची प्रतीक्षा असतानाच तापमानवाढीमुळे तीव्र काहिली निर्माण झाली आहे. उष्ण आणि कोरडय़ा वाऱ्यांच्या प्रवाहामुळे जम्मूपासून विदर्भापर्यंत उष्णतेची लाट कायम आहे. विदर्भासह आता मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही काही ठिकाणी कमाल तापमानात वाढ झाली आहे. ही स्थिती आणखी दोन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सोमवारपासून राज्याच्या काही भागांमध्ये मेघगर्जना आणि सोसाटय़ाच्या वाऱ्यासह पूर्वमोसमी पाऊस जोर धरणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.

मोसमी पावसाचा प्रवास सुरू असताना सध्या देशात परस्परविरोधी वातावरण निर्माण झाले आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये दोन दिवसांपासून उष्णतेची लाट तीव्र आहे. बर्फाच्छादित प्रदेश समजल्या जाणाऱ्या जम्मू आणि हिमाचल प्रदेशापासून ते थेट  विदर्भापर्यंत सध्या उष्णतेची लाट आहे. विदर्भात देशातील उच्चांकी तापमानाची नोंद होत आहे. राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणाचा दक्षिण भाग, दिल्ली, उत्तर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड, ओदिशा, छत्तीसगडसह विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. पुढील दोन दिवस तापमानातील वाढ कायम राहणार असून, त्यानंतर २ ते ३ अंशांनी त्यात घट होईल. विदर्भात उष्णतेची लाट ओसरताना विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता आहे.

उत्तरेपासून मध्य भारतापर्यंत उष्णतेची लाट असताना पूर्वोत्तर राज्ये आणि दक्षिणेकडील काही भागांमध्ये सध्या मोसमी आणि पूर्वमोसमी पाऊस पडत आहे. मेघालयमध्ये पावसाचा जोर सर्वाधिक आहे. आसाम, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल आणि हिमालयाच्या उपविभागात पाऊस होत आहे. केरळ आणि दक्षिण कर्नाटकमध्येही पावसाचा जोर कायम आहे. 

चढता पारा..

नागपूरमध्ये ४५.२, तर वर्धा येथे ४५.० अंश तापमान नोंदविले गेले. अकोला आणि अमरावती येथे अनुक्रमे ४४.८, ४४.२ अंश कमाल तापमानाची नोंद झाली. मराठवाडय़ात परभणी येथे ४३.३, तर औरंगाबाद आणि नांदेड येथे ४१ अंशांवर तापमान होते. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव येथे ४३.० अंश, पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर येथे ४१ अंश कमाल तापमानाची नोंद झाली. मुंबई परिसर आणि कोकणात कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या पुढे गेला आहे.

अडथळा कायम..

अरबी समुद्रातून २९ मे रोजी केरळमध्ये आणि त्यानंतर ३१ मे रोजी कर्नाटकात कारवापर्यंत दाखल झालेल्या मोसमी पावसाच्या पुढील प्रवासात प्रतिकूल वातावरणाचा अडथळा कायम आहे. सध्या मोसमी पाऊस गोव्याजवळ आहे. बंगालच्या उपसागरातील मोसमी पावसाने मात्र पूर्वोत्तर राज्यांसह हिमालयाच्या पायथ्यापर्यंत प्रगती केली आहे. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून या विभागातील प्रवासही थांबला आहे. दाखल झालेल्या विभागात तो बरसतो आहे.

ब्रह्मपुरी, गोंदिया ४६.२

विदर्भातील ब्रह्मपुरी आणि गोंदिया भागात राज्यातील उच्चांकी तापमान आहे. रविवारी या भागांत प्रत्येकी ४६.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

अंदाज काय?

राज्यात आज, ६ जूनपासून पुणे, नगर, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, परभणी, बीड, लातूर, नांदेड, िहगोली, यवतमाळ, त्याचप्रमाणे विदर्भात काही भागांत पूर्वमोसमी सरी कोसळण्याची शक्यता आहे. कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांत ८ जूनपासून पाऊस जोर धरू शकतो, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.



https://ift.tt/OuSE0wG

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: