गुंठा हा शब्द इंग्रज अधिकाऱ्यामुळे आलाय ही शुद्ध थाप आहे
आपले भिडू वाचक म्हणजे भलतेच चौकस. अधूनमधून प्रश्न विचारून आम्हाला भंडावून सोडतात. काल एका भिडूने प्रश्न विचारला की गुंठा हा शब्द एका इंग्रज अधिकाऱ्यामुळे आलाय हे खरं आहे कि काय ? आम्ही पण विचारात पडलो. पुरावा म्हणून भिडूने त्याला व्हाटस अप वर आलेला एक मेसेज पाठवला. तो मेसेज होता,
आपल्यापैकी बहुतेक लोकांनी गुंठा हा शब्द ऐकला असेलच. मात्र या गुंठा शब्दाची उत्पत्ती कशी झाली ? त्याची माहिती आपल्याला नाही. इंग्रजांनी भारतात राज्य प्रस्थापित केल्यावर जमीन महसुला करिता सबंध देशाची उभी आडवी मोजणी केली. हे काम त्यांच्या “गुण्टर” नावाच्या अधिकाऱ्याने केले. त्याने मोजणी साठी ३३ फुट लांबीची चैन (साखळी) वापरली, त्याला “गुण्टर चैन” म्हणत असत. त्यामुळे ३३ बाय ३३ फुट गुण्टर चैनने मोजलेला जमीनीचा तुकडा म्हणजे “एक गुण्टर” (गुंठा) हे रूढ झाले.
भिडूचं म्हणणं होतं आपण काय व्हाट्स अप विद्यापीठाचे विद्यार्थी नाही. तुम्हीच काय ते विस्कटून सांगा.
मग आम्ही आमच्या रिसर्च टीमला कामाला लावलं. त्यांनी जी माहिती काढून दिली ती तुम्हाला आधी सांगतो.
तर सुरवात करू गुंटर सायबापासून.
हा माणूस खरंच होऊन गेला का? तर हो. एडमंड गुंटर असं त्याच नाव. जन्म इंग्लंडमधल्या हर्टफोर्डशायर या गावचा. तो शिकला तिथल्या ऑक्सफर्ड विद्यापीठात. पण शिक्षण झालं धर्मशास्त्राचं. एका चर्च मध्ये रेक्टर बनला.
हे सगळं चालू होतं पण तरी गड्याला आवड होती गणिताची. त्याने ऑक्सफर्डमध्ये बीजगणित भूमिती शिकवण्याची नोकरी करण्यासाठी प्रयत्न केले. पण तिथले हेन्री सिजील नावाचे मुख्य वॉर्डन होते. ते जरा स्वभावाने हट्टी होते. हुशार लोकांवर त्यांचा चटकन विश्वास बसायचा नाही. गुंटरला त्यांनी काही तरी प्रश्न विचारला त्यात या सायबाने काही तरी उलट उत्तर दिल आणि चालून आलेली संधी वाया घालवली.
पुढे त्याला लंडनच्या ग्रेशम कॉलेजमध्ये ऍस्ट्रॉनॉमी चा प्रोफेसर म्हणून संधी मिळाली. या कॉलेजमध्ये तो आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत कार्यरत राहिला. तिथे त्याने आपलं गणिती डोकं लावून अनेक शोध लावले. यातलाच एक शोध म्हणजे गुंटर चेन.
हि गुंटर चेन म्हणजे एक साखळी असते जिचा वापर जमीन सर्व्हेक्षण करण्यासाठी होतो. एडमंड गुंटर याने बनवलेली ही चेन संपूर्ण जगभरात शेत मोजायला, रस्ता मोजायला उपयोगी पडते. क्रिकेटच पिच देखील १ गुंटर चेन म्हणजे २२ यार्ड असते.
आता प्रश्न राहिला आपल्या गुंठ्याचा.
गुंठा हा शब्द प्रामुख्याने महाराष्ट्रात वापरला जातो. महाराष्ट्र सोडून कर्नाटक, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि चक्क पाकिस्तानातील काही भागात देखील गुंठा हा शब्द वापरतात.
मग गुंटर चेनचा आणि गुंठाचा खरंच काही संबंध आहे का?
याच उत्तर नाही असंच म्हणावं लागेल. कारण एक म्हणजे जसा या मेसेज मध्ये दावा करण्यात येतो त्या प्रमाणे गुंटर साहेब हा कोणी अधिकारी नव्हता. त्याचा काळ १५८१ ते १६२६. म्हणजे शिवाजी महाराजांच्याही आधी. तो कधी भारतात आला देखील नाही.
एक मात्र खरं की स्वतः गुंटर साहेब भारतात आला नव्हता पण पुढे दीडशे वर्षांनी त्याची चेन भारतात आली. इंग्रजांनी या देशावर राज्य करायचं म्हटल्यावर ती मापायला देखील सुरवात केली.
पण मेसेजमध्ये सांगितल्याप्रमाणे गुंटर चेनचं माप कधीही ३३ फूट नसते. ही चेन असते २० मीटर उर्फ ६६ फूट. एकराच्या मापात विचार करायच झालं तर १० गुंटर चेन म्हणजे १ एकर. गुंठ्यांच्या हिशोबात बघायचं झालं तर ४० गुंठे म्हणजे एक एकर. म्हणजेच १ गुंटर चेन म्हणे ४ गुंठे.
झाला काय गणिताचा घोळ?
तुम्ही म्हणाल की पूर्वीच्या काळी माप वेगळं असेल तर तसे नाही. ब्रिटिश कधी मापात पाप करत नव्हते. गेली चारशे वर्षे गुंटर चेनचं माप हेच आहे. मग त्यात चूक होण्याची शक्यताच नाही.
मग गुंटरचा आणि गुंठ्यांचा संबंध असणे निव्वळ योगायोग आहे.
कोणत्याही अधिकृत वेबसाईटवर अशी माहिती आढळत नाही. त्यामुळे गुंठा हा शब्द पूर्वापार वापरातला वाटतो. आणि कुठल्या तर हुशार पाणी ओतणाऱ्या माणसाने दोन्हीचा संबंध जोडला आणि ही स्टोरी तयार केली.
हे ही वाच भिडू.
- सात-बारा उतारा आला तरी कुठणं ?
- ७ वर्ष संप केला तेव्हाच कुळ कायदा आला आणि शेतकऱ्यांची नावे सातबारा उताऱ्यावर लागली
- मौजे, खुर्द, बुद्रूक आणि कसबा, गावाच्या नावातला हा फरक कसला?
The post गुंठा हा शब्द इंग्रज अधिकाऱ्यामुळे आलाय ही शुद्ध थाप आहे appeared first on BolBhidu.com.
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: