भारताची पहिली महिला शाहीर, त्यांना घाबरून महाराष्ट्रातून हद्दपार केलं गेलं होत
शाहीर आणि शाहिरी या दोन्ही मर्दानी गोष्टी. शाहीर म्हंटल कि, आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो तो हातात डफ, डोक्याला तुर्रेदार फेटा, झब्बा पायजम्यावर कमरेला बांधलेला शेला आणि त्वेषात उडी मारून समोरच्या गर्दीला जी रं हा.. जी रं हा जी जी जी… अशी घातलेली साद. आनं त्याच्या सोबतीला साथीदारांचा जोश, तुणतुण्याची तार, एखादा टाळ आणि ढोलकीचा ताल असला कि कार्यक्रम रंगलाच म्हणून समजायचं भिडू. आणि पोवाडा म्हणजे आपल्या इतिहासातल्या वीरांच कर्तृत्व, त्यांच्या आयष्यातल्या घटना वीररसात सांगताना आणि ऐकताना अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.
दरम्यान, या शाहिरीचा सादरीकरणाचा पिंडच मुळात पुरुषी मानला जातो. खडा आवाज आणि रांगडी शरीर अश्या तयार झालेल्या शाहिरांच्या चित्रात बाई कुठं डोक्यातच येत नाही. पण म्हणून काय बाईने कधी डफ हातात घेतलाच नाही, असं नाही. या पुरुषी कला आणि परंपरेला तोडीसतोड देत नऊवारी लुगडं, डोक्यावर पदर, कपाळावर लालभडक कुंकू, हातात बांगड्या, गळ्यात काळी पोत आणि माईकसमोर उभं राहून एक धारदार आवाज घुमला. सत्तर वर्षांपूर्वीचा तो आवाज होता परभणीतल्या कळमनुरी गावच्या अनुसयाबाई शिंदेंचा.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात नेत्यांच्या सभा, मोर्चांनी जशी महत्वाची भूमिका बजावली होती, तसेच जनतेच्या मनात जागृती निर्माण करण्याचं काम त्यावेळी शाहिरांनी केलं. शाहिरी परंपरेत नजरेआड झालेल्या काही महिला शाहिरांनी आपल्या धारदार आवाजानं या चळवळीचं रान उठवलं होत. पण याची सुरुवात केली होती पहिल्या महिला शाहीर अनुसयाबाई शिंदेंनी.
अनुसयाबाईंचा जन्म साताऱ्यातल्या जगन्नाथ आणि पार्वतीबाई शिंदे यांच्या घरी ५ ऑक्टोबर १९२७ ला झाला. स्वातंत्र चळवळीत प्रतिसरकारच्या लढ्यात हे कुटुंब सहभागी होते. आंदोलनात छुप्या कारवायांत पोलिसांच्या नजरेत आल्यानं त्यांना आपला बोजा- बिस्तारा मराठवाड्यातल्या हदगाव इथं हलवायला लागला.
स्वतंत्रचळवळीच्या काळात क्रांतिसिंह नाना पाटील यांचा सहवास या कुटुंबाला लाभला. त्यावेळी अनुसया १४- १५ वर्षाच्या होत्या. नानांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या त्यांनी समाजासाठी काम करायचं ठरवलं. अनुसया राष्ट्रसेवा दलाच्या शाखेत जाऊ लागल्या. तिथं स्फूर्तिगीत, देशभक्तीपर गाणी, प्रभात फेऱ्या श्या कार्यक्रमात त्या सहभागी होऊ लागल्या. यातूनच गाण्यासाठी गळा तयार झाला आणि शाहिराच बीज तिथंच रुजलं.
नंतर नाना पाटलांनी स्वतः पुढाकार घेत त्यांचं लग्न कळमनुरीच्या शाहीर आनंदराव पाटील यांच्याशी लावून दिल. आपसूकच तिथं त्यांच्या शाहिरी कलागुणांना बळ मिळालं. याच शाहिरीचा माध्यमातून मराठवाडा मुक्तिसंग्राम, गोवा मुक्ती लढा, संयुक्त महाराष्ट्र चळवळ या लढ्यानंमध्ये त्यांनी महत्वाची कामगिरी बजावली. आपल्या शाहिरीविषयी स्वतः अनुसयाबाई एके ठिकाणी म्हणतात :
“अनुसया शिंदेला क्रांतीची गोडी । जागृत केली जनता जाऊन खेडोपाडी ।
आनंदराव पाटलांनी केली साथ नामी । स्वतंत्रसंग्रामात घेऊनी उडी ।
जुलमी निजामसत्तेची तोडलीया बेडी।
शाहिरीचा उमटला ठसा । थोर मराठवाडा असा ।”
राष्ट्रीय विचार, स्वातंत्र्यलढा, नाना पाटलांचे प्रतिसरकार, सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांचे सामाजिक कार्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी त्या गावोगावी कार्यक्रम करू लागल्या.
या दरम्यान मुंबईसोबत संयुक्त महाराष्ट्राचे वारे वाहू लागले आणि अनुसयाबाईंनी यात स्वतः झोकून दिल. त्यावेळचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्यापर्यंत या जनजागृतीचा आवाज पोहोचला आणि लोकांचा वाढता प्रतिसाद पाहून सरकारच्या डोळ्यात ते खुपलं. त्यामुळं सरकारनं १९५१ साली पहिल्यांदा शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाला २४ तासाच्या आत हदगावातुन हद्दपारीची नोटीस बजावली. स्वतंत्र भारतात शाहिरीच्या कार्यक्रमामूळं एका महिलेला हद्दपार करण्याची बहूधा पहिलीच वेळ असावी.
दरम्यान सरकारनं जरी त्यांना हद्दपार केलं होत. तरी गावकऱ्यांनी मात्र त्यांची हरप्रकारे मदत केली. हदपार बाजारतळावर मोठी सभा आयोजित करण्यात आली. या सभेला जवळपास सात – आठ हजारांचा जमाव होता. लोकांना वर्गणी काढून या कुटुंबाला आर्थिक मदत केली. बैलगाडीतून त्यांची मिरवणूक काढली. शिवाय पुढच्या प्रवासासाठी बैलगाडीची सोय करून कळमनुरीत आणून सोडले. हद्दपार केलेल्या व्यक्तीला एवढा सन्मान क्वचितच मिळाला असेल.
अनुसया घरी आल्या खऱ्या पण संयुक्त महाराष्ट्राची हाक त्यांनी काय शांत बसू देईना. तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीनं संयुक्त महाराष्ट्रासाठीचा कार्यक्रम घेतला. आसपासचा परिसर त्यांनी आपल्या आवाजानं पिंजून काढला. तो कार्यक्रम खूप गाजला.
त्यांच्या कार्यक्रमाला अफाट गर्दी व्हायची. आणि लोकांवर त्यांच्या जनजागृतीचा परिणाम दिसू लागला होता. हे पाहून इकडे मुंबईत मोरारजी बिथरले. त्यांनी पुन्हा एकदा अनुसया आणि कुटूंबियांना ९ जिल्ह्यातून हद्दपारीची नोटीस बजावली. यानंतर जायचं कुठं? खायचं काय? अशी बरीच प्रश्न समोर होती. पण त्या डगमगल्या नाही कार्यकर्त्यांच्या मदतीने त्या काही काळ हिंगोली, अमरावती मग नागपूरला राहिल्या. तिथेही त्यांनी आपल्या वाणीने लोकांच्या काळजाला हात घातला.
हळूहळू संयुक्त महाराष्ट्राची चळवळ तीव्र होऊ लागली. आधी शहरापूरताच मर्यादित असलेला हा लढा ग्रामीण भागात पोहोचवण्यात शाहिरांचे मोठे योगदान होते. त्यात अनुसया शिंदे या बिनीच्या शिलेदार होत्या.
गोवा मुक्ती आंदोलनात सुद्धा अनुसयाबाईंनी सहभाग घेतला होता. गोव्यात पोर्तुगीजांच्या विरोधात सत्याग्रह करण्यासाठी गेलेल्या एका तुकडीत त्या सहभागी झाल्या होत्या. सत्याग्रहाच्या ठिकाणी पोवाडा सादर करताना पोर्तुगीज पोलीसांचा मारही त्यांना खावा लागला.
अनुसयाबाईंनी समाजकार्यात हिरीरीने भाग घेतला. त्यानंतर १९७८ ला जर्मनी आणि १९८४ ला रशियाचा दौरा करून तिथल्या समाजव्यवस्थेचा अभ्यास करण्याची संधी त्यांना मिळाली. १९९२ मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते त्यांना शाहीर अमर शेख पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. १९९५ मध्ये परभणीत झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष नारायण सुर्वे यांच्या हस्ते पहिली महिला शाहिर म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला.
खरं तर, महाराष्ट्रातल्या त्यावेळच्या सामाजिक जीवनाचा विचार केला तर एका तरण्याताठ्या बाईला असं गावोगावी फिरून कार्यक्रम करणं येवढ सोपं नव्हतं. अनेकदा निंदानालस्ती, टिंगलटवाळी करणारे सुद्धा भेटले. पणं सगळं काही सोसूनही त्या जिद्दीनं उभ्या राहिल्या. एक वेगळी पायवाट पाडून स्वतः ला सिद्ध करणं ही लाखमोलाची गोष्ट आहे. शिंदे यांचं हे वेगळेपण यातूनच उठून दिसते.
हे ही वाच भिडू.
- आपल्या अनेक पिढ्यांना शिवरायांच्या इतिहासाची ओळख या शाहिरांच्या पोवाड्याने करून दिली.
- सुरेश भटांच्या गझलेवर नाखूष झालेल्या शाहिरांनी तिथेच त्यांना प्रत्युत्तर देणारी गझल लिहिली
- साडे तीन तास पोवाडे गात राहिले आणि त्यातून थेट संयुक्त महाराष्ट्राचा काळ उभा केला
The post भारताची पहिली महिला शाहीर, त्यांना घाबरून महाराष्ट्रातून हद्दपार केलं गेलं होत appeared first on BolBhidu.com.
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,
0 Comments: