नागपूरचा भिडू तुमच्या घरातल्या कचऱ्याला देखील बक्कळ पैसे देतो…

May 30, 2021 , 0 Comments

भारतात ‘स्वच्छता राखा’ असे किती जरी बोर्ड लावले तरी लोकं त्या बोर्डवर कचरा टाकून येतील इतकी वाईट परिस्थिती आज आहे. पण दुसऱ्या बाजूला मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करणारी लोकं असोत किंवा स्वयंप्रेरणेने देश सुंदर राहावा म्हणून प्रयत्न करणारे लोकं असोत त्यांनी केवळ टिका न करता हि परिस्थिती बदलायला आता सुरवात केली.

यापैकीच एक नाव म्हणजे नागपूरचा कपिल जंगले. 

कपिलच्या कामाच स्वरुप अगदी थोडक्यात सांगायचं तर तो तुमच्या कचऱ्याला सुद्धा पैसे देतो, आणि स्वतः देखील कमावतो. 

कपिल हा बेसिकली केमिकल इंजिनिअरिंगचा विद्यार्थी. त्यातुनचं त्यानं काही दिवस गुजरातमध्ये नोकरी देखील केली. पण जेव्हा त्याने बाहेरच्या स्वच्छता सर्वेक्षणाची पाहणी केली, कचऱ्याचं विभाजन आणि पुढे रिसायकलिंग करून त्याचा केला जाणारा पुनर्वापर या गोष्टीबद्दल जाणून घेतलं तेव्हा त्याला प्रचंड कुतूहल निर्माण झालं. 

यातुनच कपिलनं एका वर्षापुर्वी नागपूरला परत येवून ‘प्लास्टरुट्स वेस्ट मॅनेजमेंट अँड सोल्युशन’ नावाने संस्था सुरु केली.

कचरा देखील पैसे मिळवून देवू शकतो हि संकल्पना अजून नागपूरच्या शहरी आणि ग्रामीण भागात रुजली नव्हती. ती कपिलने रुजवली.

म्हणजे काय केलं तर, प्लास्टरुट्स या संस्थेच्या अंतर्गत कपिल जंगले आणि त्याच्या टीमने सर्वात अगोदर ग्रामीण भागातल्या कचरा व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित केले. यातुन कचरा विकत घेवून त्याचं संकलन, वर्गीकरण केल जातं आणि सुका कचरा रिसायकल कंपनीला पाठवला जातो. या सुक्या कचऱ्यामध्ये प्लास्टिक, काचा, कार्डबोर्ड, पेपर आणि धातूच्या गोष्टी अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो.

शहरी भागात देखील असचं स्वरुप दिलं. पण इथं डोअर डू डोअर पॉलिसीला महत्व दिलं गेलं. इथल्या घरांमध्ये जाऊन सुका कचरा गोळा केला जातो आणि त्याचा मोबदला त्या लोकांना देण्यात येतो. मोबदला देताना त्यामध्ये त्या कुटुंबाला उपयोगी पडेल अशी वस्तू असते किंवा आर्थिक मदत असते.

सोबतच शहरी भागात कम्युनिटी वेस्टेज आणि बिझनेस वेस्टेज अशा दोन विभागात हा कचरा विभागला जातो. कम्युनिटी प्रकारात म्युनिसिपल काउन्सिल, रेसिडेन्शिअल कॉम्प्लेक्सेस या भागातून कचरा गोळा जातो तर बिझनेस प्रकारात इंडस्ट्रीज, व्यावसायिक साईट्स, दुकानं, रिटेल शॉप्स, शेतीमधील वेस्टेज मटेरियल गोळा केलं जातं.

आता कपिलला यातुन काय फायदा होतो, तर त्याचं स्वच्छता हे त्याचं ध्येय तर पुर्ण होतचं आहे शिवाय, या रिसायकलिंगमध्ये प्लॅस्टिकपासून तयार होणाऱ्या गोष्टी प्लास्टरुट्स हि संस्था पुढे त्यांच्या उपयोगी कामासाठी वापरते किंवा त्याचा मोबदला घेते किंवा विक्रेत्यांना विकून त्यातून उत्पन्न मिळवते. असं व्यावसायिक पद्धतीने देखील हि संस्था काम करते.

हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीच्या अंतर्गत हि संस्था काम करते. महिन्याला जितका कचरा हिंदुस्थान युनिलिव्हरला हवा असतो त्याचं ठराविक एरियाचं कॉन्ट्रॅक्ट प्लास्टरुट्स हि संस्था घेते. महिन्याला ३० किंवा ३५ टन कचरा हा हिंदुस्थान युनिलिव्हरला हि संस्था पुरवते.

आज पर्यंत १६८ टन कचरा या संस्थेने रिसायकलसाठी पाठवला आहे. यातुन आज पर्यंत १७० झाडं वाचवल्याचा दावा कपिलने केला आहे.

या सगळ्या व्यवसायाच्या पलिकडे जात कचरा वर्गीकरण आणि संकलन याबाबत जिथे- जिथे मार्गदर्शनाची गरज पडेल तिथं तिथं ही कपिलची संस्था उभी राहते. लोकांना जावून मार्गदर्शन करते, जनजागृती करते. ही जनजागृती करताना पर्यावरणाचा होणारा ह्रास, त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम अशा गोष्टी प्रामुख्याने सांगितल्या जातात. झाडांची वृक्षारोपण करण्यावर प्लास्टरुट्सचा भर असतो.

हा अभिनव उपक्रम असल्याने त्याची दखल घेऊन या संस्थेला आणि कपिल जंगलेला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.

कपिललला भविष्यात बाहेरच्या देशांमधील असणारी स्वच्छता भारतात राबवायची आहे. यातुन स्वयंप्रेरणेने त्याने हि संस्था सुरु केली आहे. हळूहळू प्लास्टरुट्सला चांगले सहकारीही लाभले.

सध्या नागपूर आणि जिल्ह्याच्या सावनेर, मोहपा अशा ठिकाणी हि संस्था कार्यरत आहे. आता हि संस्था गडचिरोलीसारख्या भागात पाऊल ठेवत असून काही इन्व्हेस्टर लोकही या संस्थेशी निगडित आहेत.

केवळ फोटोमध्ये आपलं शहर सुंदर दिसावं यासाठीतरी आपण स्वच्छता ठेवली पाहिजे असं कपिल जंगले म्हणतो.

हे हि वाच भिडू :

The post नागपूरचा भिडू तुमच्या घरातल्या कचऱ्याला देखील बक्कळ पैसे देतो… appeared first on BolBhidu.com.



Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: