मुंबईकरांनो सावधान! दुधामध्ये अस्वच्छ पाणी भेसळ करून विक्री; दोघांना अटक

May 28, 2021 0 Comments

म. टा. खास प्रतिनिधी अंधेरी : करोनाच्या संसर्गामुळे सर्वच जण आरोग्याची काळजी घेत असताना दुधामध्ये भेसळ करून त्याची विक्री केली जात असल्याचा प्रकार गुन्हे शाखेच्या पथकाने उघडकीस आणला आहे. अंधेरी येथील एका चाळीमध्ये छापा टाकून पोलिसांनी दोघांना अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे तीनशे लिटर भेसळयुक्त दूध हस्तगत केले आहे. नामांकित कंपन्यांच्या दुधाच्या पिशव्यांमध्ये हे दोघे पाणी आणि सुमार दर्जाची भुकटी मिसळून त्याची विक्री करीत होते. अंधेरी चार बंगला परिसरात पहाटेच्या वेळी दूध वितरण करण्यापूर्वी त्यामध्ये अस्वच्छ पाणी मिसळले जात असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट १०चे सहायक पोलिस निरीक्षक धनराज चौधरी यांना मिळाली. या परिसरातून दूध भेसळीच्या अनेक तक्रारी देखील पुढे आल्या. या माहितीची शहानिशा करण्यासाठी प्रभारी पोलिस निरीक्षक किरण लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट १०च्या पथकाने पहाटेच्या सुमारास छापा टाकला. भारत नगर सोसायटीमधील एका खोलीमध्ये दोन तरुण अमूल, गोकुळ, महानंद यांसारख्या नामंकित कंपन्यांच्या दुधाच्या पिशव्या फोडून त्यातील निम्मे दूध काढत होते. रिकाम्या झालेल्या पिशवीमध्ये पाणी भरून त्या पुन्हा मेणबत्तीच्या सहाय्याने बंद करण्यात येत होत्या. अशा प्रकारचे एका लिटरचे पाणी टाकून दोन लिटर दूध करून त्याची विक्री केली जात होती. ब्लेडने फाडलेल्या पिशव्या तितक्याच सराईतपणे बंद करण्यात येत असल्याने कुणालाही भेसळ लक्षात येत नव्हती. पोलिसांनी भेसळ करणाऱ्या नरसिंहा कोटपेल्ली आणि महेश मान्द्रा या दोघांना अटक करून त्यांच्याकडून सुमारे तीनशे लिटर भेसळयुक्त दूध जप्त करून ते नष्ट केले. याशिवाय मेणबत्ती, लायटर, ब्लेड, पिन, भेसळीसाठी आवश्यक साहित्य तसेच वेगवेगळ्या कंपन्यांच्या दुधाच्या रिकाम्या पिशव्या हस्तगत केल्या.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: