केरळात मान्सूनचे आगमन किचिंत लांबणीवर; महाराष्ट्रात कधी पोहोचणार ?

May 31, 2021 0 Comments

म. टा. विशेष प्रतिनिधी, भारतीय हवामान विभागाने मान्सूनची प्रतीक्षा कायम असल्याचे सांगितले असतानाच, खासगी हवामान संस्थांनी मात्र केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याचे म्हटले आहे. यामुळे सामान्य माणूस नेहमीप्रमाणे गोंधळात पडला आहे. स्कायमेट या संस्थेने रविवारी ३० मे रोजी मान्सून भारतात दाखल झाल्याचे जाहीर केले. तर भारतीय हवामान विभागाने ३ जूनपर्यंत मान्सून केरळात दाखल होईल, असा अंदाज वर्तवला आहे. केरळमध्ये ३० मे रोजी मान्सून धडकेल, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला होता. स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून आगमनाचे निष्कर्ष पूर्ण झाले असून, केरळच्या बहुतांश भागामध्ये मान्सूनपूर्व पाऊसही जोरदार होता. मान्सूनच्या आगमनाच्या वेळी मात्र, परिस्थिती पूर्ण अनुकूल नसल्याने त्याचा प्रभाव कमी असल्याचे स्कायमेटने स्पष्ट केले आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात निर्माण होणाऱ्या चक्रीय वात स्थितीमुळे मान्सूनच्या प्रगतीला अधिक चालना मिळेल, असा अंदाज असल्याचेही स्कायमेटने म्हटले आहे. भारतीय हवामान विभागाने मात्र २७ मेपासून मान्सून श्रीलंकेमध्येच रखडला असल्याचे स्पष्ट केले. हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार १ जूनपासून नैऋत्य मौसमी वाऱ्यांना चालना मिळेल, असा अंदाज आहे. त्यामुळे केरळमध्ये पावसाची व्यापकता वाढू शकेल. त्यानंतर ३ जून रोजी मान्सून देशात दाखल होईल, अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, मेमध्ये हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार ३१ मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता होती. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याचे जाहीर करण्यासाठी १४ केंद्रांपैकी ६० टक्के केंद्रांवर दोनदिवस २.५ मिलीमीटर किंवा त्याहून अधिक पावसाची नोंद होणे गरजेचे आहे. तसेच पश्चिमी वाऱ्यांची उंची, वाऱ्यांचा वेग आदी निकष पूर्ण होणे गरजेचे आहे. स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार, बहुतांश निकष पूर्ण झाले असून, २९ आणि ३० मेच्या पावसाची आकडेवारीही जारी केली आहे. प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी मात्र हे निकष पूर्ण झाले नसल्याचे स्पष्ट करत, सध्या वारे पुरेसे सक्रिय नसल्याचे सांगितले. यामध्ये चक्रीवादळामुळे काही प्रमाणात बाष्प खेचले जाते. मात्र, मान्सूनच्या विलंबासाठी केवळ चक्रीवादळ हे कारण नसल्याचेही सांगण्यात येत आहे. मुंबईत ढगाळलेले वातावरण मुंबईत किमान तापमान आणि आर्द्रतेमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. रविवारी आभाळही ढगाळ होते. मुंबई आणि परिसरामध्ये गुरुवारपर्यंत हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गामध्ये मात्र पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. या काळात वाऱ्याचा वेग ३० ते ४० किलोमीटरपर्यंत असेल, असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: