शंकरराव चव्हाणांचा सत्कार करून युती शासनाने काँग्रेस फोडायची बीजे रोवली होती..

May 28, 2021 , 0 Comments

गोष्ट आहे नव्वदच्या दशकातली. देशातील प्रचंड अशांततेचा हा काळ. केंद्रात नरसिंहराव यांचे सरकार होते. नव्या आर्थिक सुधारणा लागू करण्याच्या ते प्रयत्नात होते मात्र राजकीय सामाजिक स्थैर्य राखणे त्यांना जमले नाही.

बाबरी मशीदीचे पतन व त्यानंतर झालेल्या दंगली, मुंबईत झालेले भीषण बॉम्बस्फोट यामुळे राज्यात काँग्रेस विरोधी जनमत तयार झाले होते. अशातच मुख्यमंत्री शरद पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे जोरदार आरोप होत होते. याचाच परिणाम विधानसभा निवडणुकीवर दिसला. काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला.

राज्यात शिवसेना भाजप युतीचा जोर वाढला होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शरद पवारांच्या विरुद्ध जोरदार प्रचाराचा रान उठवलं. त्यांची भाषणे विदर्भ मराठवाड्याच्या ग्रामीण भागात प्रचंड गाजली. त्याचाच परिणाम महाराष्ट्र विधानसभेवर भगवा झेंडा फडकवण्यात युती यशस्वी ठरली. त्यांचे मनोहर जोशी मुख्यमंत्री तर भाजपचे गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री बनले.

शरद पवारांनी या पराभवानंतर आपले लक्ष केंद्राकडे वळवले. त्यांचे लक्ष राज्याच्या मुख्यमंत्रीपदापेक्षा पंतप्रधानपदाकडे लागले होते.

केंद्रात तेव्हा महाराष्ट्रातले सर्वोच्च नेते होते तत्कालीन गृहमंत्री शंकरराव चव्हाण.

कडक शिस्तीचे हेडमास्तर म्हणून ओळखले जाणारे शंकरराव चव्हाण हे मराठवाड्याचे तारणहार म्हणून ओळखले जायचे. राज्याच्या राजकारणात त्यांचा पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांशी उभा दावा होता. माजी मुख्यमंत्री स्व.वसंतदादा पाटील यांच्याशी झालेले त्यांचे वाद संपूर्ण देशात गाजले होते.

पश्चिम महाराष्ट्रातील साखर सम्राट हे मराठवाड्याच्या वाट्याचं पाणी पळवतात हा शंकरराव चव्हाण व  त्यांच्या सहकाऱ्यांचा आरोप होता. महाराष्ट्राच्या या सहकार महर्षींच्या साखर लॉबीचं नेतृत्व वसंतदादा पाटलांच्या मृत्यूनंतर शरद पवार यांच्या कडे आले होते. यापूर्वी शरद पवारांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्रालय सांभाळलेल्या शंकरराव चव्हाणांचं पवारांशी देखील विशेष सख्य नव्हते.

केंद्रात शंकरराव चव्हाण हे पंतप्रधान नरसिंह राव यांचे विश्वासू समजले जायचे. पवार आपल्याला आव्हान ठरत आहेत हे ओळखल्यावर नरसिंह रावांनी शंकरराव चव्हाणांना बळ देण्याचं काम केलं होतं. ते हैद्राबाद मुक्तिसंग्रामच्या काळापासूनचे चांगले मित्र होते याचमुळे पंतप्रधान गृहमंत्री म्हणून ट्युनिंग देखील उत्तम जमलं होतं.

शंकररावांच्या पंचाहत्तरीनिमित्त दिल्लीत १० ऑगस्ट १९९४ रोजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला होता. अससी सत्कार महाराष्ट्रात देखील व्हायला हवा होता मात्र तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यात मागे पडले. शंकरराव चव्हाण यांच्या पंचाहत्तरीची चर्चा दिल्लीत चांगलीच रंगली.

मात्र यापेक्षाही अनपेक्षित धक्का पुढच्या वर्षभरात मुंबई मध्ये झाला. ज्या काँग्रेसने आपल्या गृहमंत्र्याचा राज्यात अमृतमहोत्सव साजरा करणे टाळलं होतं त्यांचा भव्य सत्कार शिवसेना भाजप युतीने आयोजित केला. हि बातमी वर्तमानपत्रात छापून आली तशी अनेकांच्या भुवया उंचावल्या.

शंकरराव चव्हाण यांच्या सत्कार समारंभातून शिवसेना भाजप नवीन राजकीय समीकरण मांडणार असल्याचं बोललं जात होतं.

ठरल्याप्रमाणे ७ ऑगस्ट १९९५ रोजी मुंबईत विधिमंडळात मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी शंकरराव चव्हाण यांचा भव्य अमृतमहोत्सवी सत्कार केला. दोन्ही सभागृहाचे आमदार या कार्यक्रमाला उपस्थित होते. विरोधी पक्षाच्या माजी मुख्यमंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करून शिवसेना एक चांगला पायंडा पाडत असल्याचं कौतुक सर्व आमदारांनी केलं.

यावेळी झालेल्या भाषणात मुख्यमंत्री मनोहर जोशी म्हणाले,

‘‘शंकरराव कधीच कोणाच्या पाठीत खंजीर खुपसत नाहीत. राजकारणाचा उपयोग त्यांनी संपत्ती गोळा करण्यासाठी केला नाही. भ्रष्टाचारापासून दूर राहण्याचे कठीण व्रत चव्हाणांनी पाळले. शंकरराव चव्हाण हे चकाकणारे राष्ट्रीय नेते ठरतात, यात शंकाच नाही.’’

जोशींचे हे वाग्बाण चांगलेच गाजले. महाराष्ट्रात काँग्रेसमधील पवारांच्या विरोधी गटाला आपल्या कडे ओढून घेण्यासाठीच त्यांचा हा प्रयत्न मानला जात होता. पवारांचे दुसरे विरोधक सुधाकरराव नाईक हिमाचल प्रदेशात राज्यपाल झालेले होते. तिसरे विरोधक विलासराव देशमुख विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत होऊन पवारांवर पलटवार करण्याचे मनसुबे रचत होते. मात्र पवार दिल्लीला जाण्याची पूर्वतयारी करत होते.

अशा वातावरणात शंकरराव काय बोलतात याबद्दल कमालीचे औत्सुक्य होते कारण ते देशाचे गृहमंत्री होते. आणि बाबरी प्रकरणी सेना-भाजपा आरोपीच्या पिंजऱ्यात होते.

शंकररावांचे सत्काराला दिलेले उत्तर औपचारिक स्वरूपाचे होते. त्यांनी नेमके काहीही बोलायचे टाळले आणि युतीच्या नेत्यांचा हिरमोड केला. शरद पवारांच्या नेतृत्वावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या टीका करणे त्यांनी टाळले. मनोहर जोशींना त्याचे आश्चर्य वाटले. शंकरराव चव्हाणांना सोबत घेऊन गल्लीपासून ते दिल्लीच्या राजकारणात वजन टाकण्याचा त्यांचा प्रयत्न होता.

मात्र राजकारणात काँग्रेसच्या जवळपासही जाण्यासाठी युतीला अतोनात कष्ट करावे लागतील हे सत्य शंकररावांनी अप्रत्यक्षपणे अधोरेखित केले.

या सत्कारामुळे महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये फूट पडून पक्षाला घरघर लागेल असा दावा करणारे तोंडघशी पडले. आपापसात कितीही मतभेद असले तरीही त्याचा फायदा विरोधकांना करून देण्यास शंकरराव चव्हाण तयार झाले नाहीत.

हे ही वाच भिडू.

The post शंकरराव चव्हाणांचा सत्कार करून युती शासनाने काँग्रेस फोडायची बीजे रोवली होती.. appeared first on BolBhidu.com.



Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: