नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे सी-६० कमांडो महाराष्ट्र पोलीस दलाची शान आहेत

May 22, 2021 , 0 Comments

गडचिरोली जिल्ह्यात शुक्रवारी झालेल्या चकमकीत १३ नक्षलवाद्यांना ठार मारण्यात आले. ही कारवाई केलीये महाराष्ट्र पोलीस दलाच्या सी-६०युनिटने. महाराष्ट्र पोलीस, केंद्रीय निमलष्करी दले असतांना का सी-६० युनिट तयार करण्यात आले? देशात नक्षलवाद्या विरोधात लढतांना सी-६० युनिट यशस्वी मॉडेल म्हणून का पाहण्यात येते.

गोष्ट आहे ८० च्या दशकातली. घनदाट जंगल असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी कारवाया वाढल्या होत्या. महाराष्ट्र पोलीस बरोबरचे केंद्रीय पोलीस फोर्स नक्षलवाद्या विरोधात लढत होत्या. मात्र, म्हणावे तसे यश मिळत नव्हते. युद्ध जिंकता येत नसेल तर नीतीत बदल करावा लागतो.

आंध्रप्रदेश छत्तीसगड पासून ओडिशा महाराष्ट्रातल्या गडचिरोली पर्यंत पसरलेला नक्षलवाद्यांचा रेड कॉरिडॉर हा देशासाठी डोकेदुखी बनला होता. 

हे जाणून १९९० मध्ये गडचिरोली जिल्ह्यात स्थानिक तरुण ज्यांना स्थानिक भाषेची चांगली जाण आणि परिसराची माहिती अशा कमांडो युनिटची गरज आहे हे तत्कालीन पोलीस प्रशासनाला जाणवले.

पण हे कमांडो युनिट बनवणार कोण हा मुख्य प्रश्न होता.

मुंबई पोलिसमध्ये के. सूर्यवंशी नावाचे उपायुक्त त्याकाळी विशेष गाजत होते. त्यांनीच चेंबूर येथील रमाबाई आंबेडकर नगर येथील तणाव योग्य पद्धतीने हाताळला होता. त्यांच्या कामाबद्दल भरभरून बोलण्यात येत होते. वसंत सराफ तेव्हा महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक होते.

के. सूर्यवंशी यांची कामाची पद्धत पाहून सराफ यांनी त्यांना गडचिरोली येथे जाण्याची विनंती केली. मात्र, के. पी. सूर्यवंशी टाळाटाळ करत होते. अखेर पोलीस महासंचालकांनी सूर्यवंशी यांना गडचिरोली मध्ये नक्षलवादी कारवाया वाढल्या असून सध्या पोलीस अधीक्षक कोणीही नाहीत तुम्हाला जावे लागेल असा आदेश दिला.

गडचिरोलीसाठी १०० कोटींची तरतूद

शरद पवार मुख्यमंत्री असतांना गडचिरोली जिल्ह्यातील विकास आणि नक्षलवादी कारवाया थांबविण्यासाठी एक्शन प्लान तयार केला होता. त्यासाठी १०० कोटींची तरतूद सुद्धा करण्यात आली होती. मात्र असे झाले की शरद पवार केंद्रात गेले आणि त्यांच्या ऐवजी सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री म्हणून आले. पण तरीही यात खंड पडला नाही.

के. पी. सूर्यवंशी यांनी गडचिरोली येथे पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार हातात घेतल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, एक्शन प्लन मधील पोलीस स्थानिक पोलिसांना काहीही मदत करत नाही. आरपीएफच्या आठ तुकडा तैनात होत्या.  त्यांना गडचिरोली पोलिसांमध्ये मर्ज करण्यात आले. तरीही काही फरक पडला नाही.

स्थानिक आदिवासी तरुणांची भर्ती

के. पी. सूर्यवंशी यांना समजले की स्थानिक भाषा आणि भागाची माहिती नसलेले अनेक जण यात आहेत. केवळ स्थानिक लोकांची टीम जर तयार केली तरचं काही तरी उपयोग होईल असे त्यांना वाटले. त्यावर त्यांनी काम केले.

काही तरुण नक्षलवाद्याना कंटाळले होते. तर काही तरुण अगोदरच पोलीस दलात सहभागी झाले होते. अशावेळी या तरुणांच्या घरच्यांना नक्षलवादी त्रास देत. ही गोष्ट लक्षात घेत के. पी. सूर्यवंशी यांनी त्यांना सांगितले की, आम्ही तर दोन वर्षात बदलून जाणार तुम्हाला इथे राहायचे आहे. त्यावेळी काही तरुण पुढे त्यांनी नक्षलवाद्या प्रमाणे १५-१५ चा ग्रुप करून जंगलात फिरू देण्याची मागणी केली होती.

के. पी.  सूर्यवंशी यांनी नक्षलवाद्या विरोधात राग असणारे, नक्षलवाद्यामुळे नुकसान झालेले अशांची वेगळी नावे काढली. गडचिरोली अशा १०० पोलिसांची निवड करून त्यांना प्रशिक्षणासाठी हैदराबाद येथे पाठवून देण्यात आले.

१ डिसेंबर १९९० रोजी महाराष्ट्र पोलीस दलाच  सी-६० युनिट तयार झाले.

पुढे यात २ हजार जण सामील झाले. मात्र अजूनही या युनिटला सी-६० चं नावाने ओळखण्यात येते. या युनिटचे कौतुक केंद्र सरकारने केल असून नक्षलग्रस्त इतर राज्यांना सी-६० चं अनुकरण करायला सांगितले आहे.

देशात जिल्हा स्तरावर तयार करण्यात आलेले एकमेव युनिट सी-६०

महाराष्ट्र पोलिसांपेक्षा सी-६० युनिट वेगळे कसे

राज्यातील पोलीस अधिकारी आणि शिपायांना नाशिक येथील पोलीस अकादमी येथे प्रशिक्षण दिले जाते. मात्र, महाराष्ट्र पोलीस दलाचा एक भाग असणाऱ्या सी-६० युनिट मध्ये भर्ती होणाऱ्यांना महाराष्ट्र पोलीस मध्ये भर्ती होणाऱ्या पोलिसांना पेक्षा वेगळ प्रशिक्षण देण्यात येते.

सी-६० मधील जवानांना खास जंगल युद्धासाठी प्रशिक्षित करण्यात येते. नाशिक येथील पोलीस अकादमी ऐवजी हैद्राबादच्या ग्रे-हाउंड्स, नॅशनल सिक्युरिटी गार्डच्या मानेसर आणि पूर्वांचलाच्या आर्मी वॉरफेयर शाळेतून विशेष असे प्रशिक्षण देण्यात येते.

सी-६० युनिटने आपली वेगळी ओळख केली त्यांची तुलना कोब्रा, एनएसजी, स्पेशल फोर्सशी करण्यात येते. सी-६० युनिटचे जवान आधुनिक शस्त्रे वापरण्यात माहीर असल्याचे सांगण्यात येते.   

केंद्राने नक्षलग्रस्त राज्यांना सी-६० चे अनुकरण करायला सांगितले

केंद्र सरकाने निमलष्करी दल आणि इतर राज्याच्या पोलीस दलाला नक्षलवादा विरोधात लढण्यासाठी  सी-६० युनिटचे अनुकरण करायला सांगितले होते. २०१८ मध्ये केंद्र सरकाने केंद्रीय निमलष्करी दलाच्या सर्व महासंचालकाना पत्र पाठविले होते. ज्यात सी-६० नक्षलवादा विरोधात कसे लढतात त्याचे कौशल्य आणि त्या प्रकारचा सराव करण्याचा सल्ला दिला होता.

केंद्रीय निमलष्करी दल आहे मात्र तरही सी-६० युनिट का तयार करावे लागले

केंद्रीय राखीव पोलीस दल, सीमा सुरक्षा दल, नॅशनल सिक्युरिटी गार्ड, असे अनेक केंद्रीय निमलष्करी दले देशाभरात कार्यरत आहेत. गडचिरोली भागात नक्षलवाद्या विरोधात लढत असतांना केंद्रीय निमलष्करी दलांना स्थानिक माहिती आणि भाषेचा अडसर ठरत होता. सी-६० युनिट मधील जवानांना स्थानिक माहिती आणि भाषा येत असल्याने नागरिकांशी संपर्क ठेवण्यात अडचण येत नाही. त्याचा फायदा युनिटला झाला.

गेल्या काही वर्षात सी-६० कमांडोजना अनेक शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

आज गडचिरोलीचे सी-६० युनिट नक्षलवाद्यांविरोधात राबवल्या जाणाऱ्या मोहिमेसाठी संपूर्ण देशभरात ओळखले जाते. त्यांच्या पराक्रमाचे दाखले सर्व पोलीस दलात दिले जातात. असे हे जांबाज पोलिसांचे युनिट महाराष्ट्र पोलीसचा भाग आहे ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे.

हे ही वाच भिडू.

 

The post नक्षलवाद्यांचा खात्मा करणारे सी-६० कमांडो महाराष्ट्र पोलीस दलाची शान आहेत appeared first on BolBhidu.com.



Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: