सुपरस्टार असूनही अपमान केला गेला, तेव्हाच ठरवलं राजकारणात उतरून मुख्यमंत्री बनायचं

May 28, 2021 , 0 Comments

८० च्या दशकाच्या सुरवातीची हि गोष्ट. तेलगू चित्रपटांचा अनभिषिक्त सम्राट  ओळखले जाणारे सिनियर एनटीआर म्हणजे नंदमुरी तारक रामाराव. यांच्यासोबत घडलेल्या घटनेची कुणी कल्पनाही केली नसेल. या घटनेने आंध्र प्रदेशाचं राजकारण बदललं आणि काँग्रेस पक्षाचा त्या राज्यातून कायमचा पत्ता कट झाला.

त्यावेळी एनटी रामाराव हे नेल्लोर या आंध्र प्रदेशाच्या एका छोट्या शहरामध्ये दौरा करत होते. तेव्हा अशा छोटया शहरांमध्ये हॉटेल्स वगैरेंच्या सोयी नव्हत्या. आता अशा परिस्थितीत रामाराव सरकारी सर्किट हाऊस मध्ये गेले. पण ज्यावेळी ते सर्किट हाऊसला गेले तेव्हा त्यांना तिथे कळलं कि सगळेच रूम बुक झाले आहेत.

पण एक खोली हि उपलब्ध होती. पण तिथल्या केअर टेकरने रामाराव यांना सांगितले कि हि रूम उपलब्ध नाहीए, राज्यसरकारच्या एका खास मंत्र्यासाठी ती आरक्षित आहे. आता हा पुन्हा पेच निर्माण झाला. एनटी रामाराव तिथेच घुटमळत उभे राहिले.

केअर टेकर हा एनटी रामारावांचा जबरदस्त चाहता होता. त्याने एनटी रामरावांच्या स्टारडमकडे बघून ती आरक्षित मंत्र्याची खोली त्यांना फ्रेश होण्यासाठी दिली. एनटी रामरावांना तो केअर टेकर सांगून गेला कि मंत्री यायच्या आत तुमचं यावरून घ्या नाहीतर गडबड होईल.

आता त्या रूममध्ये गेल्यावर रामाराव अंघोळीसाठी प्रस्थान झाले. आता कुठं त्यांची अंघोळ अर्ध्यात आली होती कि मंत्र्यांची एंट्री झाली. आता त्या राज्याच्या मोठ्या मंत्र्याने आपल्या खोलीत दुसऱ्याच व्यक्तीला पाहिलं तेव्हा त्यांचं डोकं सणकल. त्यांनी सर्किट हाऊसच्या केअर टेकरला बोलावून घेतलं. रामराव आणि केअर टेकरवर शिव्यांची बरसात सुरु केली.

या प्रकरणामुळे एनटी रामाराव यांना तिथल्या सर्किट हाउसवरून काढता पाय घ्यावा लागला पण या घटनेचं त्यांना प्रचंड दुःख झालं. त्यांना त्या नेत्याच्या बोलण्याने आतून बाहेरून हादरवून टाकलं. काही दिवसांनंतर रामाराव चेन्नईत पोहचले. त्यावेळी त्यांनी आपला जिवलग मित्र नागी रेड्डीला घडलेली घटना सांगितली.

हे सगळं प्रकरण ऐकल्यावर नागी रेड्डी रामारावांना म्हणाले कि,

भलेही तू कितीही मोठा स्टार असला, इतकं स्टारडम तुझ्या पाठीशी असलं तरी हिरोच्या हातात काहीच पावर नसते, खरी पावर असते ती राजकारणी लोकांच्या हातात.

या घटनेचा आधीच रामारावांना राग आला होता, मित्राच्या बोलण्याने त्यांना आत्मविश्वास मिळाला आणि त्यांनी तेव्हाच ठरवलं कि आपण आता आपला राजकीय पक्ष स्थापन करायचा आणि नेता बनायचं.

पुढे १९८२ साली काँग्रेस पक्षाचे महासचिव राजीव गांधी होते, टी अंजय्या हे आंध्र प्रदेशाचे काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री होते. एके दिवशी राजीव गांधी आपल्या पक्षाच्या काहीतरी कामानिमित्त हैद्राबादला पोहचले. त्यावेळी राजीव गांधींना बघण्यासाठी हैद्राबादच्या बेगमपेट एअरपोर्ट वर मोठी गर्दी जमा झाली. एअरपोर्टवर राजीव गांधींच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री टी अंजय्या जातीने हजर होते.

आता नेतेलोकांसोबत असणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले. साहजिकच इतक्या गर्दीमुळे वाहतुकीची कोंडी होऊ लागली आणि चेंगराचेंगरीची शक्यता निर्माण झाली. एवढी प्रचंड गर्दी पाहून राजीव गांधी मुख्यमंत्रांवर नाराज झाले. आता या अव्यवस्थेवर राजीव गांधींनी एअरपोर्टवरच मुख्यमंत्रांचे वाभाडे काढले, त्यांचा पाणउतारा केला.

राजीव गांधींनी मुख्यमंत्रांचा केलेला अपमान इतका मोठा होता कि दुसऱ्या दिवशी आंध्रप्रदेशच्या वर्तमान पत्रांमध्ये हि घटना हेडलाईन बनून छापून आली.

हि घटना बघून एनटी रामाराव खुश झाले, याच्याशिवाय दुसरा योग्य क्षण कोणताच नाही म्हणून त्यांनी २९ मार्च १९८२ साली हैद्राबादमध्ये त्यांनी आपल्या नवीन तेलगू देसम या पक्षाची स्थापना केली. आता एनटी रामाराव यांनी एक जबरदस्त शक्कल लढवली, त्यांनी लोकांना सांगितलं कि,

राजीव गांधींनी फक्त मुख्यमंत्रांचा अपमान केला नसून तर समस्त आंध्र प्रदेशच्या लोकांचा अपमान केला आहे. यातून त्यांनी काँग्रेसला आपल्या राज्यातून हाकलून लावण्याची तयारी केली.

त्यांनी घोषणा केली कि, मी आता ६० वर्षांचा असून , ३००हुन अधिक चित्रपट केले आहे आणि आता मला तुमची सेवा करायची आहे. ९ महिन्यानंतर झालेल्या आंध्र प्रदेश निवडणुकांमध्ये रामाराव यांनी केलेल्या आवाहनाला लोकांनी प्रतिसाद दिला आणि काँग्रेस पक्षाला पराभूत केलं. बहुमताने तेलगू देसम पक्ष विजयी झाला.

एनटी रामाराव यांनी आपल्या अपमानाचा बदला एखाद्या चित्रपटाच्या स्क्रिप्टला शोभेल असा घेतला होता.

हे हि वाच भिडू :

 

The post सुपरस्टार असूनही अपमान केला गेला, तेव्हाच ठरवलं राजकारणात उतरून मुख्यमंत्री बनायचं appeared first on BolBhidu.com.



Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: