सरदार पटेलांचे जे काही पुतळे बसविले गेलेत, त्यातले अर्धे तर नेहरूंनीच उद्घाटन केलेले आहेत

May 23, 2021 , 0 Comments

सध्याची व्हाट्सएप युनिव्हर्सिटी समाजात तेढ निर्माण करण्याचं एक जबरदस्त हत्यार आहे. फक्त व्हाट्सएपच कशाला, जहरी प्रचारवाले फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि शक्य असेल तो तो सर्व सोशल मीडिया वापरून चुकीच्या गोष्टी पसरवतात.

यापैकीच एक म्हणजे..

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दुष्मनीचे खूप सारे किस्से आपण या सोशल मीडिया युनिव्हर्सिटीत ऐकले.

भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या या दोन नेत्यांमध्ये आपसात लढत होती का? की नुसताच प्रोपागंडा..

सरदार पटेल हे नेहरूंचे एक सक्रिय सहकारी होते. त्यांचे परस्पर मतभेद ही होते. पण मतभेद असलेल्या व्यक्तीच्या नावे कोण कशाला विद्यापीठ सुरु करील?

पण भूतकालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी सरदार वल्लभभाई पटेल हयात असतानाच त्यांच्या नावाच्या विद्यापीठाचा पाया घातला होता.

सरदार पटेल आणि नेहरूंमध्ये राजकीय विचारसरणीला घेऊन मतभेद होते. काही वेळेस देश पातळीवरच्या मुख्य विषयांवर त्या दोघांची मतं भिन्न होती. यावरून काहीवेळा त्यांनी वेगळे होण्याचे निर्णय सुद्धा घेतले. स्वातंत्र्य चळवळीतील एक कॉम्रेड आणि एक महात्मा गांधींचे शिष्य म्हणून दोघांनाही समाजात आदराचेच स्थान होते.

पण फुटीच्या काही गोष्टींमुळे भाजप-आरएसएस गटाला मर्यादेपलीकडे मदत झाली. आपण ऐकतो ती स्टोरी खरतर अर्धवटच आहे.

भारतातील व्हाट्सएप युनिव्हर्सिटीतून माहिती मिळवणाऱ्या लोकांना हे ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल की,

गुजरात आणि उर्वरित भारतात सुरवातीच्या टप्प्यात सरदार पटेलांचे जे काही पुतळे बसविले गेलेत, त्यातले अर्धे तर नेहरूंनीच उद्घाटन केलेले आहेत. ते पण सरदार पटेल हयात असताना.

नेहरूंनी गोध्रा शहर चौकात सरदार पटेल यांच्या पितळी मूर्तीचे अनावरण केले होते. ते आपल्या भाषणात सरदारांच्या विषयी गौरवोद्गार काढताना म्हणाले,

“सरदार पटेल हे स्वातंत्र्याच्या कार्यात शूर सेनानी म्हणून ओळखले गेले आहेत. स्वातंत्र्य मिळविल्यानंतर आता ते टिकवून ठेवण्याच्या कामात ते मग्न आहेत. त्यांनी भारताचा नकाशाच बदलला आहे. काम करताना आमच्यात काही मतभेद आहेत. पण असा एक दिवस किंवा रात्र गेली नसेल की जेव्हा मी सरदारांचा सल्ला घेतला नसेल.”

(टाइम्स ऑफ इंडिया १४ फेब्रुवारी १९४९).

सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपली वकिली गोध्रा या शहरात सुरु केली होती. त्याच शहरात पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर नेहरूंनी टाऊन हॉलची सुद्धा पायाभरणी केली. अखेरीस, लोकवर्गणीतून जमा झालेल्या दोन लाख रुपयांच्या खर्चाने हे बांधकाम केले गेले. तत्कालीन रेल्वेमंत्री लाल बहादुर शास्त्री यांनी या टाऊन हॉलचे उदघाटन सरदार पटेल यांच्या वाढदिवशी ३१ ऑक्टोबर १९५४ रोजी केले.

गुजरात मधील आणंद या शहरातून गोध्राला जाण्यापूर्वी पंतप्रधान नेहरूंनी त्याच दिवशी सरदार यांच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या असलेल्या वल्लभ विद्यानगर या विद्यापीठाची पायाभरणी केली होती. हे ठिकाण जवळच्या करमसड गावाला लागून आहे.

सरदारांच्या मृत्यूनंतर नेहरूंनी सरदार पटेल यांच्या आणखी एका पुतळ्याचे अनावरण केले.

७ डिसेंबर १९५२ रोजी बडोद्याच्या भेटीदरम्यान त्यांनी स्थानिक कॉंग्रेस पार्टी कार्यालय, सरदार भवनात ‘इलेक्ट्रिक बटण दाबून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अर्धपितळी मूर्तीचे अनावरण केले होते.

या सगळ्यात नेहरूंची वाहवा करण्यात सरदार पटेल ही कधीच कमी पडले नाहीत.

नेहरूंच्या ५९ व्या वाढदिवसानिमित्त, पटेल यांनी संविधान सभेत सांगितले की, “महात्मा गांधींनी पंडित नेहरूंना त्यांचा राजकीय वारस म्हणून निवडले आणि ही जबाबदारी योग्य व्यक्तीवर पडली हे पाहून त्यांना फार समाधान वाटले. पटेल पुढे म्हणाले,

नेहरू खरोखरच गांधीजींनी ठरवून दिलेल्या आदर्शांचे पालन करीत आहेत. जगातील सर्व राष्ट्रांशी सलोखा टिकवून भारत आपला दर्जा नक्कीच उंचावेल. त्यांनी असेही नमूद केले की ते गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ सहकारी आणि बंधूंप्रमाणे सोबत आहेत.

याबदल्यात प्रतिक्रिया देताना नेहरू म्हणाले कि,

सरदार पटेल यांच्या आपुलकी आणि सल्ल्याशिवाय ते देश चालवूच शकले नसते.

सरदार पटेल यांची मुलगी मणिबेन पटेल ज्यांनी सरदारांची सचिव म्हणून काम केले होते. त्या ही नेहरू आणि सरदारांचे संबंध कसे होते याविषयी सांगताना म्हणतात, ते दोघेही दिल्लीमधील यॉर्क रोड येथे राहत होते. असा क्वचितच एखादा दिवस गेला असेल की जेव्हा ते भेटले नसतील. दुपारी १ वाजता ते दोघे ही जेवणासाठी एकत्र येत असत किंवा परत कार्यालयात जाताना किंवा रात्री नेहमीच दोघेही एकत्र असत.

दोघांच्या गप्पा इतक्या गहन असत की, मग गप्पा मारत मारत ते एकमेकांच्या घराच्या गेटपर्यंत जात आणि त्यांना आपण आपल्या घरापर्यंत पोहोचलो आहे हे समजत ही नसे.

मनिबेन पटेल यांनी पुढे असेही म्हटले आहे की,

“जवाहरलालजी यॉर्क रोड येथील निवासस्थान सोडून तीन मुर्ती येथे राहायला गेले तेव्हा काही लोकांनी त्या दोघांच्यात गैरसमज निर्माण करण्याचे प्रयत्न देखील केले.”

त्यानंतर पटेल-नेहरू यांच्या वाढत चाललेल्या मतभेदांमुळेच भाजपा आणि आरएसएस वाढण्यासाठीचे काम केले. कॉंग्रेसनेही सरदारांपासून लांब अंतर ठेवल्याने, दोघांत फूट पडल्याच्या गोष्टींना हातभार लावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी नंतर दोघांच्या दुष्मनीचे किस्से बाहेर पडू लागले. यात नेहरूंना व्हिलन ठरवण्यात आलं. पण नेहरूंनी अनावरण केलेल्या सरदारांचा गोध्रा येथील पुतळा तर काहीतरी वेगळीच साक्ष देतो…

दोघांमधील सलोख्याची साक्ष

हे ही वाच भिडू 

The post सरदार पटेलांचे जे काही पुतळे बसविले गेलेत, त्यातले अर्धे तर नेहरूंनीच उद्घाटन केलेले आहेत appeared first on BolBhidu.com.



Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: