अँटिलिया प्रकरण: मुंबई पोलीस दलातील आणखी एका अधिकाऱ्याला NIAकडून अटक
मुंबई: अँटिलिया आणि मनसुख हिरन हत्या प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दलातील आणखी एका अधिकाऱ्याला अटक केली आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट ११मधील पोलीस निरीक्षक यांना आज, शुक्रवारी एनआयएने अटक केली. या प्रकरणात अटक झालेले माने हे मुंबई पोलीस दलातील तिसरे अधिकारी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, घटना घडली त्यावेळी सुनील माने हे युनिट ११मध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते. या घटनांमध्ये त्यांचे नाव समोर आल्यानंतर त्यांची बदली करण्यात आली होती. अँटिलिया आणि मनसुख हिरन हत्या प्रकरणात सहभाग असल्याच्या आरोपांवरून सुनील माने यांना राष्ट्रीय तपास संस्थेने काल, गुरुवारी चौकशीसाठी बोलावले होते, असे कळते. त्यांचा सहभाग स्पष्ट झाल्याने माने यांना आज, शुक्रवारी अटक करण्यात आली. माने यांना कोर्टात हजर करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. याआधी या केंद्रीय संस्थेने या प्रकरणांत चार जणांना अटक केली होती. त्यात मुंबई पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि रियाझ काझी यांचा समावेश आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: