सातारा: सोसायटीच्या चेअरमनचे अपहरण; शिवसेना नेत्यासह ६ जणांना जामीन

April 02, 2021 0 Comments

सातारा: तालुक्यातील पानवन विकास सेवा सोसायटीचे चेअरमन धनाजी शिंदे यांच्यासह त्यांच्या मित्रांच्या प्रकरणात माण तालुक्यातील शिवसेना नेते शेखर गोरे यांच्यासह सहा जणांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. शिंदे आणि त्यांच्या मित्रांचे अपहरण करून कुळकजाई येथील फार्महाउस आणि ठाणे येथील लॉजवर डांबून ठेवल्याची तक्रार त्यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात दिली होती. तक्रारीनुसार, २५ फेब्रुवारी रोजी धनाजी शिंदे आणि त्यांचे मित्र विठ्ठल कृष्णा शिंदे, राहुल राजू तुपे, सुखदेव महादेव शिंदे, विजय छबू चव्हाण हे जेवणासाठी कारमधून म्हसवड येथील कोर्टाच्या पाठीमागील बाजूस मायणी रोडलगत असलेल्या हॉटेलमध्ये गेले होते. तेथे जेवण करून रात्री आठ वाजता ते बाहेर निघाले. त्या वेळी त्यांच्यासमोर म्हसवड बाजूकडून एक कार येऊन थांबली. त्या कारमधून शेखर भगवान गोरे, राजेंद्र उर्फ राजू ब्रम्हदेव जाधव, संग्राम अनिलकुमार शेटे, राहुल अर्जुन गोरे आणि एक अनोळखी व्यक्ती खाली उतरली. त्यातील राजू जाधव हे त्यांच्याजवळ गेले. माझ्या कारमध्ये बसा, चर्चा करायची आहे, असे त्याने त्याना सांगितले. त्यानंतर विजय छबू चव्हाणने कारमध्ये बसण्यास नकार दिला. त्यावेळी संग्राम शेटे याने त्याला जबरदस्ती पकडून कारमध्ये कोंबले. तर विठ्ठल शिंदे, राहुल राजु तुपे, सुखदेव महादेव शिंदे हे त्याच ठिकाणी थांबले. दोघे जण कारमध्ये बसल्यावर कुळकजाई येथील शेखर गोरे याच्या फार्महाउसवर घेऊन गेले. कारमधून जाताना अपहरणकर्त्यांनी सर्वांचे फोन काढून घेतले. कुटुंबीयांना संपर्क साधण्यास मनाई केली. वर्षभरापूर्वी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळाच्या उमेदवारास मतदान करण्याकरीता पानवन विकास सेवा सोसायटी लिमिटेड पानवन या सोसायटीचे सभासद डॉ. नानासो आण्णा शिंदे यांच्या नावे ठराव घेतला असून, काही दिवसांत जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक होणार आहे. त्यांना बोलावून घ्या व त्यांना आम्हास मतदान करायला सांगा, असे त्यांनी सांगितले. कार कुळकजाई येथील फार्महाउसवर नेल्यानंतर तेथे दोन दिवस याच ठिकाणी थांबा, असे सांगितले. डॉ. नानासो आण्णा शिंदे काय म्हणाताहेत ते बघा आणि दोन दिवसांनी तुम्हाला घरी सोडतो, असे सांगून आम्हाला तेथे डांबले, असे तक्रारदाराने सांगितले. २६ फेब्रुवारी रोजी दुपारी शिंदे आणि त्यांचे मित्र विजय चव्हाण याला विरकुमार पोपटलाल गांधी, दत्तात्रय कुंडलिक घाडगे, राहुल अर्जुन गोरे व चालक हरिदास गायकवाड यांनी कारमध्ये बसवून फिरायला जायचे आहे असे सांगून ठाण्यात नेले. तेथे लॉजवर थांबवले. दुसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजता पुन्हा लॉजवरुन कारमध्ये बसवले. २८ तारखेला पहाटे चार वाजता पुन्हा कुळकजाई येथील फार्महाऊसवर आणले. तेथून पोलिसांनी सुटका केली. याबाबत शिंदे यांनी गोरे यांच्यासह सहा जणांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या प्रकरणात वडूज न्यायालयाने गोरे याच्यासह सहा जणांना जामीन मंजूर केला आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: