पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू; असुरक्षित प्रकल्पाने घेतला बळी?
अमरावती: जिल्ह्यातील नांदगाव पेठनजीकच्या बोरनदी प्रकल्पामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली आहे. अग्निशमन दलासह रेस्क्यू टीमने शर्थीने प्रयत्न करून रात्री ९ वाजता मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळाले. साहिल शहा इस्माईल शहा असे मृत युवकाचे नाव असून तो आपल्या मित्रांसह फिरण्यासाठी या प्रकल्पावर आला होता. शुक्रवारची नमाज अदा करून साहिल शहा इस्माईल हा मित्रांसह बोरनदी प्रकल्पावर फिरण्यासाठी आला होता. साहिलच्या मित्रांना पोहता येत असल्याने त्यांनी पाण्यात उडी घेऊन पोहण्यास सुरुवात केली. साहिललादेखील पोहण्याचा मोह आवरला नाही त्यानेही पाण्यात उडी घेतली मात्र पाण्यात उडी टाकल्यानंतर तो बाहेर आलाच नाही. मित्रांनी शोधाशोध केली परंतु साहिलचा कुठेच ठावठिकाणा लागला नाही. अखेर त्याच्या मित्रांनी कुटुंबीयांना या घटनेची माहिती दिली आहे. घटनेची माहिती नांदगांव पेठचे ठाणेदार अनिल कुरळकर यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दल व रेस्क्यू टीमला पाचारण केले. सुरुवातीला अग्निशमन दलाने गळाच्या साहाय्याने मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र अंधार असल्याने साहिल चा मृतदेह शोधण्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या. अखेर रेस्क्यू टीमने पाण्यात उद्या घेऊन शोधाशोध सुरू केली व अथक परिश्रमानंतर शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या दरम्यान साहिलचा मृतदेह हाती लागला. रेस्क्यू टीमच्या वतीने पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी साठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केला. यावेळी साहिलच्या कुटुंबीयांनी व मित्रांनी एकच आक्रोश केला होता. यावेळी रेस्क्यू टीमचे हेमंत सरकटे, योगेश घाटगे, कौस्तुभ वैद्य, अर्जुन सुंदरडे, भूषण वैद्य, आकाश निमकर, देवानंद भुजाडे, सचिन धरमकर, दिपक डोरस, उदय मोरे, महेश मंदारे आदींनी मृतदेह बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: