परभणी: डीवायएसपींच्या जीपला अपघात; ठेकेदार, अभियंत्यासह सुपरवायझरविरोधात गुन्हा

April 03, 2021 0 Comments

परभणी: जिल्ह्यातील पूर्णा ते चुडावा रस्त्यावर नर्‍हापूर येथील पुलाजवळ प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांच्या वाहनाला गुरूवारी पहाटे पावणेचारच्या सुमारास झाला. या अपघातात प्रभारी उपविभागीय अधिकारी सुभाष राठोड हे जखमी झाले असून, त्यांनी याबाबत रस्त्याचे काम करणार्‍या ठेकेदार, अभियंत्यासह सुपरवायझर व कामगारांविरोधात चुडावा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेले सुभाष राठोड यांच्याकडे पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी पूर्णा उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून अतिरीक्त प्रभार दिला आहे. राठोड हे गुरुवारी रात्री जिल्हा चेकिंग ड्युटी करत होते. यावेळी राठोड हे स्वतःच जीप चालवत होते. त्यावेळी ते पूर्णा ते चुडावा रस्त्यावरून नर्‍हापूर नालापुलाजवळून जात होते. त्यावेळी तेथे पुलाचे काम चालू असल्याने त्या कामाजवळ ठेकेदार, अभियंत्यासह सुपरवायझर यांनीही कोणीही काम चालू आहे, उजवीकडे वळा असा दिशादर्शक फलक लावलेला नाही किंवा रस्त्यावर दगडेही लावलेली नाहीत. त्यामुळे राठोड हे तेथून जात असताना त्यांना नेमका रस्ता लक्षात आला नाही. शिवाय समोरून येणार्‍या वाहनाच्या प्रकाशदिव्यांमुळे राठोड यांचे जीपवरील नियंत्रण सुटले व जीप नादुरूस्त असलेल्या पुलाजवळ आदळली. यात जीपचे नुकसान झाले असून, कर्मचारीही जखमी झाला असल्याचे त्यांनी चुडावा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी चुडावा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास फौजदार पंडीत हे करीत आहेत. दरम्यान, सुभाष राठोड यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे समजते. जिल्ह्यातील जवळपास सर्वच प्रमुख रस्त्यांची कामे अनेक महिन्यांपासून संथगतीने सुरू असून रहदारीसाठी वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय धुळीमुळे येथून प्रवास करणाऱ्यांना श्वसनाचाही त्रास झाल्याचे अनेक तक्रारी समोर येत आहे. आज राठोड यांच्या अपघातानंतर कंत्राटदार आणि संबंधितांविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर आतातरी या कामांना गती मिळते का, हे पाहाणे महत्वाचे ठरणार आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: