मुंबईच्या या भिडूने उभारला वडापावचा १०० कोटींचा व्यवसाय….

April 28, 2021 , 0 Comments

मुंबईत वडापावच्या दुकानांची संख्या मोजता येणार नाही इतकी आहे. स्ट्रीटफूड आणि मुंबईची शान म्हणून ओळखला जाणारा वडापाव जंबोकिंग या नावाने त्याचा ब्रँड तयार होईल असं कुणालाही वाटलं नसेल. आज आपण बघूया साध्या वडापावची जंबोकिंग ब्रॅंडरूपी झालेली बदली आणि या बदलातून मालकाने उभारलेला १०० कोटींचा व्यवसाय.

मुंबईत राहणाऱ्या धीरज गुप्ता यांनी साधारण असणाऱ्या वडापावचं रूपांतर जंबोकिंग बर्गरमध्ये केलं आणि या ब्रॅण्डला केएफसी, मॅकडोनाल्डसारख्या मोठ्या ब्रॅण्डच्या यादीत नेऊन पोहचवलं.

या व्यवसायाच्या सुरवातीला दोन लाख रुपये त्यांना गुंतवावे लागले नंतर मात्र जंबोकिंग बर्गर अशा नावाने त्या वडापावचा त्यांनी ब्रँड तयार केला आणि त्यातून त्यांनी १०० कोटींची उलाढाल केली.

धीरज गुप्ता यांच्या घरी वडिलांचा मिठाई तयार करण्याचा व्यवसाय होता आणि त्यांच्या वडिलांचा आग्रह होता कि धीरज यांनी हा व्यवसाय वाढवावा. १९९८ मध्ये त्यांनी बिजनेस मॅनेजमेंट हा कोर्स पूर्ण केला. हा तो काळ होता जेव्हा मॅक्डोनल्ड्स आणि डॉमिनोज हे ब्रँड आपली मूळ भारतात रोवू पाहत होती. धीरज याना मिठाई विक्रेत्यांची चेन सप्लायर सिस्टीम बनवायची होती. त्यांना विश्वास होता कि दररोजच्या विकल्या जाणाऱ्या मिठायांना जर व्यवस्थित पॅक करून बाजारात आणल्या तर त्या हातोहात विकल्या जातील मात्र त्यांची हि आयडिया फ्लॉप ठरली.

या मिठाईची सिस्टीम बनवण्याच्या प्रयत्नात त्यांच्यावर ५० लाखांचं कर्ज झालं होत, एकीकडे डॉमिनोज आणि मॅकडॉनल्ड्सचा वाढता खप त्यांना गप्प बसू देत नव्हता. शेवटी वैतागून त्यांनी मिठाई विक्रीचा नाद सोडला आणि क्विक सर्व्हिस रेस्टोरंट बिझनेस मध्ये ते प्रशिक्षण घेऊ लागले.

मॅक्डोनल्डच्या बर्गरच्या धर्तीवर त्यांनी वडापाव सुद्धा आपण मुख्य प्रवाहात आणू शकतो असा विचार त्यांनी केला. स्वच्छ आणि ताजे वडापाव विकायचा विश्वास ठेवून त्यांनी २००१ साली २लाख रुपयांचं कर्ज घेतलं आणि व्यवसायाला सुरवात केली. मालाड रेल्वे स्टेशनच्या बाहेर १५०-२०० स्क्वेअर फुटाची जागा भाड्याने घेतली. आज जो जगभरात लोकप्रिय बनलेला ब्रँड आहे जंबोकिंग त्याची अशी सुरवात झाली.

इतर ठिकाणी मिळणाऱ्या वडापावच्या आकाराच्या तुलनेत हा वडापाव जरा मोठा होता यामुळे त्यांच्या व्यवसायाला फायदा झाला. त्यांच्या या जंबोकिंगची वाढती लोकप्रियता बघून इतर दुकानदारांनीसुद्धा तसा प्रयत्न चालू केला मात्र धीरज गुप्तता यांच्या जम्बोकिंगचं नाव आणि गुणवत्ता सगळीकडे माहिती होती आणि त्यांच्या शाखा वाढू लागल्या होत्या त्यामुळे प्रतिस्पर्धी लोकांचा टिकाव लागला नाही. 

धीरज गुप्तांना मार्केटिंगचा चांगला अनुभव असल्याने त्यांनी विविध प्रयोग करून आपला ब्रँड विस्तारला. वडापाव मध्ये बटाट्याच प्रमाण आणि पावाचा/ब्रेडचा आकार वाढवला आणि त्यांचा हा बदल ग्राहकांना सुद्धा आवडू लागला. त्यांनी सबवे या ब्रॅण्डची फ्रेंचायजी स्वीकारली आणि त्या अंतर्गत भारतात व्यवसाय वाढवला.

२०१० सालापर्यंत एकूण ३२ शाखा त्यांनी उभारल्या होत्या मात्र मुंबई सोडून इतर राज्यांमध्ये त्यांना फायदा झाला नाही. कारण इतर लोकांना वडापाव हा फक्त मुंबईला जाऊन खायचा असतो इतकंच माहिती होत. ज्या त्या राज्यात तिथलं लोकल असलेलं खाद्य खपलं जात त्यामुळे इतर ठिकाणी लाभ झाला नाही. २०१२-१३ साली त्यांनी त्यांच्या कंपनीच्या मालकीचे ५२ दुकानं उभारली.

वडापाव या ब्रॅण्डला जम्बोकिंगच्या रूपाने रिब्रँड करताना विशेषतः त्याची स्वछता, मॅन्युफॅक्चरिंग आणि इतर सगळ्या बारीकसारीक गोष्टींची काळजी घ्यावी लागली. जम्बोकिंग वडापाव हा पुढे बर्गर ब्रँड म्हणून ओळखला जाऊ लागला तेव्हा त्यांनी त्यांच्या ब्रॅण्डला बर्गर बॉर्न इन इंडिया म्हणायला सुरवात केली.

आज या व्यवसायाची १०० कोटींपर्यंत मजल गेली असून भारतभरात विविध ठिकाणी शाखा आहेत. या शाखांमध्ये जम्बोकिंगच्या नावाखाली टैनगी मेक्सिकन, कॉर्न पालक, नाचोज, चीज ग्रिल्ड अशा अनेक पदार्थांची निर्मिती केली जाते. ग्राहकांचा वाढता ओढा हि सगळ्यात सुदैवाची बाब या ब्रॅण्डसाठी आहे.

युवा व्यावसायिकांना ते सांगतात कि,

पर्यायाच्या भानगडीत पडू नका, कुठल्याही एकाच गोष्टीवर लक्ष द्या, त्यावर मेहनत घ्या तुमच्या प्रयत्नाला यश येईल. तुमच्या जिद्दीची परीक्षा अशा व्यवसायांत बघितली जाते त्यामुळे प्रयत्न करत रहा.

हे हि वाच भिडू :

The post मुंबईच्या या भिडूने उभारला वडापावचा १०० कोटींचा व्यवसाय…. appeared first on BolBhidu.com.



Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: