शरद पवार म्हणतात तसं खरचं साखर कारखान्यांना ऑक्सिजन निर्मिती करणं शक्य आहे का?

April 25, 2021 , 0 Comments

राज्यात सध्या ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा जाणवायला लागला आहे. त्यावर उपाय ठिकठिकाणी नवीन ऑक्सिजन प्लांट सुरु करणं, दुसऱ्या राज्यातून मेडिकल ऑक्सिजन आणून रुग्णांपर्यंत पोहोचवणं, ऑक्सिजन एअरलिफ्ट करणं असे उपाय सुरु आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक नवीन उपाय सुचवला आहे.

वसंतदादा शुगर इन्स्टिटयूटचे अध्यक्ष असलेले शरद पवार यांनी राज्यातही साखर कारखान्यांनी मेडिकल ऑक्सिजनची निर्मिती करावे असं म्हंटलं आहे. त्यानुसार इन्स्टिटयूटचे संचालक शिवाजीराव देशमुख यांनी १९० कारखान्यांना या संदर्भात पत्र पाठवलं आहे. मात्र यानंतर एक प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे तो म्हणजे,

खरंच साखर कारखान्यांना ऑक्सिजन निर्मिती करणं शक्य आहे का?

त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला मेडिकल ऑक्सिजन निर्मितीची प्रक्रिया काय असते हे पाहावं लागेल. 

हवेत १०० टक्के पैकी २१ टक्के ऑक्सिजन आणि ७८ टक्के नायट्रोजन असतो. तर १ टक्के हायड्रोजन, नियोन, कार्बन डायऑक्साईड असतो.

मेडिकल ऑक्सिजन बनवण्याच्या सगळ्यात पहिल्या टप्यात प्लांटमध्ये हवेतुन वर सांगितलेल्या सगळ्या गॅसमधून ऑक्सिजन बाजूला काढला जातो. त्यासाठी एअर सेप्रेशपन तंत्रज्ञानाचा वापर करतात. म्हणजे काय तर हवेला कॉंप्रेस केलं जातं, आणि फिल्टर करुन त्यातील नको असलेले घटक काढून टाकले जातात. पुढे या फिल्टर झालेल्या हवेला थंड केलं जातं.

यानंतर त्या हवेला डिस्टिलं केलं जातं. त्यामुळे ऑक्सिजन बाकी गॅसपासून वेगळं होतं आणि याच प्रक्रियेदरम्यान ऑक्सिजनच लिक्विडमध्ये परिवर्तन होतं आणि त्याला एकत्र केलं करतात. लिक्विड ऑक्सिजनला मोठ्या कॅप्सुलसारख्या टँकमध्ये भरुन हॉस्पिटलपर्यंत पोहचवलं जातं. आणि हॉस्पिटलमधील पाईपद्वारे त्याला रुग्णांपर्यंत पोहचवलं जातं.

पण सगळ्याचं ठिकाणी या पाईपची व्यवस्था नसते. त्यावर उपाय म्हणून वापरले जातात ऑक्सिजनचे सिलेंडर. या सिलेंडर्समध्ये भरण्यासाठी लिक्विड ऑक्सिजनला वायुरूप ऑक्सिजनमध्ये बदललं जात. त्यासाठी देखील वेगळे प्लांट आहेत. याठिकाणी हे ऑक्सिजन भरलं जातं आणि ते थेट रुग्णाच्या बेडजवळ पोहोचवलं जातं.

आत्ता साखर कारखान्यांना हे शक्य आहे का त्याचा आढावा घेवू

याची पार्श्वभूमी अशी की शरद पवारांनी लिहलेलं पत्र आणि त्यानंतर VSI चे जनरल सेक्रेटरी शिवाजीराव देशमुख यांच्यामार्फत साखर कारखान्यांना लिहण्यात आलेलं पत्र.

वसंतदादा शुगरमधून काय पत्र लिहिण्यात आलं आहे?

या पत्रात कारखान्यांना प्रामुख्यानं एक गोष्ट सांगितली आहे ती म्हणजे इथेनॉल शुद्ध करण्याचा आणि कार्बनडायऑक्साईड वेगळा करण्याच्या ठिकाणी फक्त प्राणवायू वेगळा करण्याचा प्रकल्प उभारायचा आहे. या संदर्भात तांत्रिक प्रक्रियेची माहिती घेऊन पुढील कार्यवाही करावी.

VSI Letter

कारखान्यांना ऑक्सिजन निर्मिती करणं शक्य आहे का?

या संदर्भांतून ‘बोल भिडू’ने माळशिरस तालुक्यातील श्रीपूरमधील श्री. पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक यशवंत कुलकर्णी यांच्याशी संपर्क केला. ते म्हणाले,

कारखान्यांना ऑक्सिजन निर्मिती करणं शक्य आहे का? तर आहे. आम्ही त्यासाठी प्रकल्प उभारणीला सुरुवात देखील केली आहे.

व्हॅक्युम प्रेशर स्विंग ऍबसॉर्शन थेअरी यावर आधारित हा प्रकल्प असणार आहे. पण यासाठी साधारण ६ ते ८ महिने सहज लागू शकतात. कारण हा प्रकल्पच पूर्ण वेगळा आहे.

इथेनॉल तयार करत असताना त्यासाठी मॉलिक्यूलर सिव्हज वापरल्या जात असतात. त्यात आरएस ९४ ते ९५ टक्के असते. आणि इथेनॉल ९९.८ टक्के असते. म्हणजे ४.५ ते ५ टक्के जास्त आरएसमध्ये पाणी असते. हे पाणी काढण्याचं काम हे सिव्हज करत.

पण आता हे इथेनॉल थांबवून ऑक्सिजन प्लांट सुरु करायचा म्हंटलं तर यातील जे सिव्हज असतात ते ऑक्सिजनसाठी चालत नाहीत. त्या बदलाव्या लागतात. पण त्यातील एक गोष्ट म्हणजे ह्या सिव्हज इम्पोर्टेड आहेत. त्या भारतात बनत नाहीत, बाहेरूनच मागवाव्या लागतात. 

सोबतच इथेनॉल प्लांटमधील डिस्टिलरी वापरता येत. बाकी एअर फिल्टर, कॉम्प्रेसर, बॉटलिंग करण्यासाठी लागणार हेडर या सगळ्या गोष्टी बाहेरून आणाव्या लागतात.

एका सिलेंडरमध्ये साधारण ६ ते ७ एमक्यूब ऑक्सिजन भरला जातो.

आता आमचा हा चांगला प्रकल्प उभारण्याचं नियोजन आहे ते १२५ एमक्यूब प्रतितास. म्हणजे प्रतितासाला साधारण १५ सिलेंडर. यासाठी असे प्रकल्प उभारण्यासाठी तंत्रज्ञान पुरवणाऱ्या ‘सांघी’ या नामांकित संस्थेशी चर्चा सुरु आहे. पण सध्या साहित्याचं शॉर्टेज असल्याचं देखील सांगण्यात येत आहे.

थोडक्यात काय तर माहिती घेतल्यानंतर अस दिसून येत की, साखर कारखाने ऑक्सिजनची निर्मीती करण्यासाठी सक्षम आहेत पण त्यासाठी वेळ लागू शकतो.

हे हि वाच भिडू

The post शरद पवार म्हणतात तसं खरचं साखर कारखान्यांना ऑक्सिजन निर्मिती करणं शक्य आहे का? appeared first on BolBhidu.com.



Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: