Sangli News: किंमती वस्तूंवरून रस्त्यात भांडत होते, निघाले अट्टल चोर; 'असा' झाला पर्दाफाश
म. टा. प्रतिनिधी, : सांगली शहरासह जिल्ह्यात चोऱ्या आणि घरफोड्या करणारी सराईतांची टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शुक्रवारी (ता. १२) सकाळी जेरबंद केली. चोरीतील मुद्देमालाची वाटणी करताना तीन चोरट्यांमध्ये वाद सुरू होता. याची माहिती मिळताच पोलिसांनी तिन्ही चोरट्यांना शिताफीने जेरबंद केले. यात एका अल्पवयीन चोरट्याचाही समावेश आहे. त्यांच्याकडून दहा गुन्ह्यांची उकल झाली आहे. गेंडा उर्फ आकाश संतोष जाधव (वय १९, रा. वाल्मिकी आवास नगर), करण रामा पाटील (वय २१, रा. कुपवाड), रोहित बाळू सपाटे (वय १९, रा. वाल्मिकी आवास नगर) अशी अटकेतील चोरट्यांची नावे आहेत. यांच्यासह अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात वाढलेल्या चोरीच्या घटनांमुळे रेकॉर्डवरील चोरट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकार्यांनी दिल्या होत्या. शुक्रवारी सकाळी पंचशील रेल्वे गेटजवळ समाज कल्याण भवनसमोर काही तरुण आपसात वाद घालत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांना मिळाली. या माहितीची खातरजमा करण्यासाठी त्यांनी सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांच्यासह पथक पाठवले. यावेळी समाज कल्याण भवनसमोर आपसात वाद घालणारे चार तरुण आढळले. पोलिसांनी तातडीने चौघांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्यांच्याकडून विसंगत उत्तरे मिळाली. अंगझडती घेतली असता, तिघांकडून चोरीतील सोने-चांदी आणि मोबाइल मिळाले. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी सर्व मुद्देमाल चोरीचे असल्याची कबुली दिली. अल्पवयीन चोरट्यासह चौघांनी गेल्या दोन महिन्यात सात घरफोड्या केल्या आहेत. घरफोड्यांसह एक जबरी , तर दोन दुकानांमध्ये चोऱ्या केल्याची त्यांनी कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून चार मोबाइलसह ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्याकडून आणखी काही गंभीर गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी वर्तवली आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: