मुलांसमोरच पत्नी आणि तिच्या प्रियकराची केली हत्या, आजीवन कारावास
अमरावती: लहान मुलांसमोरच पत्नी आणि तिच्या प्रियकराची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी पतीला जिल्हा व सत्र न्यायालयाने आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली. जिल्हा न्यायाधीश (क्रमांक ४) एस. ए. सिन्हा यांच्या न्यायालयाने बुधवारी हा निकाल दिला. मिळालेल्या माहितीनुसार, गजानन मारोती गजभिये (३८, रा. शेंदोळा बु.) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. प्रियंका व गजानन गयभिये हे पती-पत्नी होते. त्यांना तीन मुले आहेत. परंतु २०१८ मध्ये प्रियंका व गजानन यांच्यात वाद सुरु झाले होते. त्यामुळे प्रियंका ही तिच्या एका मुलीला व मुलाला घेऊन पतीपासून वेगळी येथे राहू लागली. याबाबत तिने नांदगाव पेठ पोलिसांना सूचनाही दिली होती. दरम्यान अमरावतीत मुलांसह स्वत:चा उदरनिर्वाह चालवण्यासाठी ती केटरिंगच्या कामाला जात होती. यातूनच तिची ओळख पद्माबाई डोंगरेशी झाली. त्यानंतर तिची ओळख पद्मा यांचा मुलगा महेशसोबत झाली. प्रियंका व महेश यांच्यात प्रेमसंबंध सुरु झाले. ही माहिती गजाननला मिळाली होती. दरम्यान प्रियंका व महेश हे दोघेही वडगाव जिरे येथे गेल्याची माहिती गजाननला मिळाली. माहिती मिळताच गजानन गजभिये याने १८ जुलै २०१८ ला प्रियंका व महेशला संपवण्याची तयारी केली. त्याच दिवशी सायंकाळी सहा वाजता गजाननने वडगाव जिरे गाठून चिमुकल्या मुलांच्या डोळ्यांदेखत त्यांच्या आईला म्हणजेच प्रियंकासह महेशची सपासप वार करुन हत्या केली. मुलांच्या सांगण्यावरून वडगावचे पोलीस पाटील यांनी या घटनेची माहिती बडनेरा पोलिसांना दिली. माहिती मिळताच बडनेराचे तत्कालीन ठाणेदार शरद कुळकर्णी आणि तत्कालीन सहायक पोलिस आयुक्त यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणात पद्मा भास्कर डोंगरे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गजाननविरोधात गुन्हा नोंदवला. दरम्यान, बडनेरा पोलिसांनी तपास पूर्ण करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. दंडाची रक्कम चिमुकल्यांना देण्याचे न्यायालयाचे आदेश न्यायालयात सरकारी पक्षाकडून सहायक सरकारी वकील मंगेश भागवत यांनी एकूण नऊ साक्षीदार तपासले. या प्रकरणातील पुरावे व सीए रिपोर्ट ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी गजानन गजभियेला खून प्रकरणी आजीवन सश्रम कारावास, दहा हजारांचा दंड व दंड न भरल्यास दोन वर्षे सश्रम कारावास, ५ हजारांचा दंड व दंड न भरल्यास सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. या दंडातून मिळालेली सर्व रक्कम १५ हजार रुपये मृत महिलेच्या मुलांना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: