एसटी महिला कंडक्टरला दमदाटी; कोर्टाने रिक्षाचालकाला दिली 'ही' शिक्षा

March 03, 2021 0 Comments

म. टा. प्रतिनिधी, नगर: रस्त्यावर बस थांबवून रिक्षातील प्रवासी का घेतले, या रागातून एसटीच्या महिला वाहकाला दमबाजी केल्याप्रकरणी रिक्षाचालक आणि त्याच्या साथीदारांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. तालुक्यातील भातकुडगाव फाट्यावर जून २०१४ मध्ये घडलेल्या या घटनेचा निकाल लागला आहे. एसटीचे प्रवासी पळवून कर्मचाऱ्यांनाच दमबाजी करणारे रिक्षाचालक आणि अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना हा दणका मानला जात आहे. एसटीच्या वाहक प्रमिला पालवे यांनी यासंबंधी फिर्याद दिली होती. न्यायालयातही त्यांनी धाडसाने साक्ष दिली. १८ जून २०१४ रोजी त्या शेवगावच्या एसटी बसवर वाहक म्हणून काम करीत होत्या. भातकुडगाव फाट्यावरून दहीगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरील थांब्यावर त्यांनी बस थांबविली. तेव्हा तेथे आधीच उभ्या असलेल्या रिक्षात काही प्रवासी बसलेले होते. एसटी बस थांबल्याचे पाहून ते रिक्षातून उतरले आणि बसमध्ये जाऊन बसले. याचा रिक्षाचालकाला राग आला. त्याने व साथीदारांनी बसच्या वाहक पालवे यांना शिवीगाळ केली तसेच धमकीही दिली. पालवे यांनी शेवगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सरकारी कामात अडथळा आणल्याचा आणि दमदाटी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. या खटल्याची न्यायालयात सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील जी. के. मुसळे यांनी बाजू मांडली. फिर्यादी पालवे यांच्यासह अन्य साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. न्यायालयासमोर आलेला पुरावा, साक्षीदारांच्या साक्षी व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपींना शिक्षा दिली. अरविंद योसेफ कांबळे (वय २२), बापू चंद्रभान चव्हाण (वय २७ रा. शहर टाकळी, ता.शेवगाव) व समीर बबन सय्यद (वय २७, रा. आंत्रे, ता.शेवगाव) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी १ महिना साधी कैद व ५०० रुपये दंड, दंड न भरल्यास १५ दिवस साथी कैद, धमकी दिल्याबद्दल १ महिना साधी कैद व ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास १५ दिवस साधी कैद अशी शिक्षा देण्यात आली आहे. आरोपींना सरकारी कामात अडथळा आणणे, शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी जिल्हा न्यायाधीश राव यांनी ही शिक्षा सुनावली. या खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने अतिरीक्त सरकारी वकील जी. के.मुसळे यांनी कामकाज पाहिले. या खटल्याच्या कामकाजात सहायक फौजदार ए के. भोसले यांनी सहकार्य केले.


from Ahmednagar News | अहमदनगर बातम्या | Ahmednagar News in Marathi | Ahmednagar Local News - Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: