हलगर्जीपणा नडला! पुण्यातील तीन बड्या खासगी लॅब सील

March 09, 2021 0 Comments

म. टा. प्रतिनिधी, पुणे चाचणी केलेल्या आणि पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची अपुरी माहिती पाठविणाऱ्या तीन खासगी पुणे महापालिकेने सोमवारी सील केल्या. त्यामध्ये 'क्रस्ना लॅब', 'मेट्रोपोलिस लॅब' आणि 'सबअर्बन डायग्नोस्टिक सेंटर' या बड्या खासगी प्रयोगशाळांचा समावेश असून, पुढील आदेश येईपर्यंत करोना चाचणी करू नका, अशी ताकीद या प्रयोगशाळांना देण्यात आली आहे. वारंवार सूचना देऊनही प्रयोगशाळेत करोना चाचणी करणाऱ्यांची माहिती वेळेत न दिल्याबद्दल; तसेच अपूर्ण पत्ते पाठविल्याने 'कॉन्टॅक्ट ट्रेसिंग'मध्ये अडथळे येत आहेत. त्यामुळे या प्रयोगशाळांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला. अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी सोमवारी याबाबतचे आदेश दिले. खासगी प्रयोगशाळांमध्ये करोना चाचणी करणाऱ्या व्यक्तींचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आदी माहिती तपशीलवार नोंदवली जात नाही. या पैकी एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यास त्रोटक माहितीमुळे त्यांच्याशी संपर्क साधण्यास; तसेच त्यांच्या संपर्कातील व्यक्ती शोधण्यात अनेक अडचणी येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यात खासगी प्रयोगशाळा चालकांची बैठक घेऊन, करोना चाचणी करणाऱ्या व्यक्तींची संपूर्ण माहिती नोंदवून २४ तासांच्या आत महापालिकेकडे पाठविण्याच्या सूचना केल्या होत्या. या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या आठ पॅथॉलॉजी लॅबचालकांना महापालिकेने गेल्या आठवड्यात नोटीस बजावून परवाना रद्द करण्याचा इशाराही दिला होता. मात्र, त्यानंतरही प्रयोगशाळांकडून करोना चाचणी करणाऱ्या व्यक्तींची माहिती उशिराने आणि अपुरी पाठवली जात आहे. त्यामुळे महापालिकेने तीन प्रयोगशाळा सील करण्याची कारवाई केली आहे. 'पुणे' एवढाच पत्ता नमूद... प्रयोगशाळेत चाचणी केलेल्या रुग्णांची माहिती आवश्यक नमुन्यात वेळेत मिळत नाही; तसेच काही रुग्णांचे पत्ते अपूर्ण असून, काही ठिकाणी फक्त 'पुणे' एवढाच पत्ता नमूद केलेला असतो. अपूर्ण पत्त्यांमुळे रुग्णांना शोधताना क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना अडचणी येतात. त्यामुळे 'कॉन्टॅक्ट ट्रेसिंग' वेळेत पूर्ण होऊ शकत नाही. परिणामी रुग्णांची संख्या वाढू शकते. ही बाब गंभीर आहे, अशी चिंता महापालिका प्रशासनाने प्रयोगशाळांना पाठविलेल्या पत्रात व्यक्त केली आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: