मध्यरात्रीची वेळ, नाकाबंदी सुरू होती; २ दुचाकी सुस्साट येत होत्या, त्याचवेळी...
अमरावती/धारणी: आंध्र प्रदेशाच्या विशाखापट्टणम येथून थेट येथे ३० किलो गांजा घेऊन येणाऱ्या पाच तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दोन दुचाकी आणि तीन महागडे मोबाइल जप्त केले आहेत. नागपूर- इंदूर या आंतरराज्यीय महामार्गावर गुरुवारच्या मध्यरात्री (ता. ११) नाकाबंदी करून धारणी पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे. अटक केलेल्या पाच आरोपींपैकी एक अल्पवयीन आहे. त्याला बाल सुधारगृहात पाठवण्यात येणार आहे. इतर आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी यांनी दिली. पोलीस सूत्रांनुसार, धारणी पोलिसांनी ११ मार्च रोजी मध्यरात्री नागपूर-इंदूर आंतरराज्यीय महामार्गावर नाकाबंदी केली होती. या दरम्यान पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णींच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने बासपानी फाट्यावर दोन दुचाकी थांबवल्या. त्यावरील पाच तरुणांची झडती घेतली. त्यांच्याकडून तब्बल ३० किलो गांजा आणि तीन महागडे मोबाइल जप्त केले. अटक करण्यात आलेल्या पाच तरुणांपैकी एक आरोपी हा अल्पवयीन असून, शेख शाहीद शेख शफी ( वय २५, रा. मालेगाव, नाशिक), मोहम्मद नसिम शेख यासीन (वय ४८, रा. नेहरुनगर धारणी), अब्दुल कूददूस अब्दुल रऊफ (वय २५, रा. दुबई मोहल्ला धारणी), शेख आबीद अब्दुल रऊफ ( वय १९, रा. दुबई मोहल्ला, धारणी) अशी उर्वरित आरोपींची नावे आहेत. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत ३ लाख ९१,७०० रुपये आहे. तर दोन दुचाकी, ३ मोबाइल असा एकूण ५ लाख १ हजार ७०० रुपये किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. धारणी पोलीसांकडून संबधित पाचही तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धारणी येथील कोर्टासमोर त्यांना हजर करण्यात येणार आहे. त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे. एका अल्पवयीन आरोपीस बालसुधारगृहात पाठवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही धाडसी कारवाई करण्यात आली. डॉ. हरिबालाजी एस., पोलीस अधीक्षक, ( ग्रामीण ) आणि उपविभागीय पोलीस अधीक्षक संजय काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत गिते करत आहेत.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: