खर्च वाचवण्यासाठी लॉकडाऊनमध्ये उरकलं मुलीचं लग्न, पुढं घडलं...

March 04, 2021 0 Comments

म.टा. प्रतिनिधी, नगर: लॉकडाउनच्या काळात लग्न झालेल्या एका अल्पवयीन मुलीने सासरच्या मंडळींकडून छळ होत असल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दिली आहे. मात्र, हा बालविवाहाचा प्रकार असल्याने आता सासर आणि माहेरच्या मंडळींविरूद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लॉकडाउनच्या काळात कमी खर्चात लग्न होत असल्याने अनेक आई-वडिलांना आपल्या मुलींची घाईघाईत लग्न लावून दिली. त्यातील काहींचे दुष्परिणाम आता समोर येऊ लागले आहेत. मुख्य म्हणजे या काळात अनेक बालविवाह झाल्याचा संशय व्यक्त होत होता, चाइल्ड लाइन संस्थेने असे काही प्रकार हाणूनही पाडले होते. जामखेड तालुक्यातील असाच एक प्रकार आता चाइल्ड लाइन संस्थेमुळेच उघडकीस आला आहे. आधी आपली फसवणूक आणि आता छळ सुरू झाल्याचे लक्षात आल्यावर एका अल्पवयीन मुलीनेच चाइल्ड लाइनशी संपर्क साधला. तिच्या तक्रारीवरून नगरच्या तोफखाना पोलिस ठाण्यात दोन्ही बाजूंच्या लोकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पंधरा वर्षांच्या मुलीच्या बाबतीत घडलेली घटना भयानक आहे. तिने फिर्यादीत म्हटले आहे की, जून २०२० मध्ये एका २२ वर्षीय तरुणासोबत तिचे लग्न लावण्यात आले. त्यावेळी लॉकडाऊन सुरू होता. त्यामुळे गर्दी न जमविता साधेपणाने विवाह झाला. लग्नानंतर त्या मुलीला गर्भधारणा झाली. मात्र, सासरच्या मंडळींनी एवढ्यात मूल नको होते. त्यामुळे तिच्यावर गर्भपात करण्यासाठी दबाव सुरू झाला. शिवाय लग्नाआधी ठरल्याप्रमाणे तिला पुढील शिक्षण पूर्ण करायचे होते. मात्र, लग्न झाल्यानंतर पती आणि सासरच्या मंडळींनी त्यासाठी विरोध केला. त्यावरूनह तिचा छळ सुरू झाला. तिचा पती तिला सतत मारहाण, शिवीगाळ, दमदाटी करू लागला. यामुळे वैतागलेल्या मुलीने नगरच्या चाइल्ड लाइन संस्थेकडे संपर्क साधला. त्यानुसार चाईल्ड लाईनमधील स्वयंसेवकांनी तिची बाजू समजून घेतली. हा गंभीर गुन्हा असल्याचे सांगू तिला धीर दिला. पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार देण्याचा पर्याय सूचवला. मुलीनेही तो मान्य केला. त्यानुसार तिने नगरच्या तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तिच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तिचे आई-वडील, पती, सासू-सासरे यांच्यासह सात जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला. बाललैंगिक अत्याचार व बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम या कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा विवाह लावण्यामध्ये मुलीचे आई-वडील मुलीचे सासू-सासरे यांच्यासह सात लोकांचा सहभाग होता. याप्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे करीत आहेत.


from Ahmednagar News | अहमदनगर बातम्या | Ahmednagar News in Marathi | Ahmednagar Local News - Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: