'पवारांना चुकीची माहिती दिली गेली'; फडणवीसांनी कागदपत्रेच दाखवले
मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांमुळं गृहमंत्री अनिल देशमुख वादात सापडले आहेत. विरोधीपक्ष नेते यांनीही महाविकास आघाडी सरकारला कोंडित पकडण्याचा प्रयत्न केला आहे. आज फडणवीसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. तसंच, राष्ट्रवादी काँग्रेसवरही आरोप केले आहेत. 'गृहमंत्री अनिल देशमुख १५ फेब्रुवारीला होम क्वारंटाइन नव्हते. ते एका खासगी विमानानं मुंबईत आले होते. त्या दिवशी ते अनेकांना भेटले होते, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसंच, शरद पवारांना योग्य माहिती पुरवली गेली नाही,' असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. '१५ तारखेची गृहमंत्र्यांची ही कार्यक्रम पत्रिका आहे. १५ तारखेला ते एका खासगी विमानाने आले होते. तेव्हा ते ते आपल्या घरी होते. पण पोलीस विभागाच्या दैनंदिन कामाचा माझ्याकडे एक कागद आहे. त्यात १७ फेब्रुवारीची एक तारीख आहे. त्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतला राहतील. तर अनिल देशमुख हे दुपारी ३ वाजता सह्याद्रीला येतील. त्यानंतर २४ तारखेला पुन्हा अनिल देशमुख हे ११ वाजता मोटारीने निवासस्थानी जाणार असल्याची पोलिसांची माहिती आहे. अर्थात त्या कार्यक्रमानुसार ते गेले असतीलच असा माझा दावा नाही,' असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. 'महत्त्वाची बाब म्हणजे परमबीर सिंग यांनी जे पत्र लिहिलं आहे, त्यात मेसेजचा पुरावा दिला आहे. त्यात त्यांनी पाटील यांना बैठकीबद्दल विचारलेलं होतं. याचाच अर्थ पवारांना चुकीची माहिती दिली गेली त्यांच्या तोंडून चुकीची माहिती वदवून घेतली आहे,' असा आरोप फडणवीसांनी केला आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: