पुणे: हॉटेलच्या नावाखाली सुरू होते हुक्का पार्लर, पोलीस पथक धडकले; पण...
म. टा. प्रतिनिधी, हडपसर: ग्रामीण हद्दीतील येथील "हॉटेल जे २ के" या हुक्का पार्लरमध्ये शनिवारी रात्री लोणी काळभोर पोलिसांची धाड टाकून हुक्का पार्लरच्या मालकासह पाच जणांना अटक केली. तर हुक्का ओढणारे मागील दरवाजातून पळून गेले. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये हॉटेल मालक अक्षय दिलीप जगताप (वय २९, रा. हांडेवाडी, ता. पुणे), मॅनेजर कुमार विलास गोफणे (वय ३०, रा. होळकरवाडी, ता. हवेली, जि. ) सचिन मधुकर मोटे (वय ३३, रा. हांडेवाडी, ता. हवेली, जि. पुणे), आकाश राजू कहार (वय २४, रा. गाडीतळ, हडपसर), गजेंद्र अशोक काटकर ( वय ३१, रा. तुकाई दर्शन, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांनी सांगितले, होळकर वाडी येथे मोठ्या प्रमाणात चालू असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर यांना मिळाली होती. त्यानुसार महानोर यांनी पोलीस पथकांच्या मदतीने "हॉटेल जे २ के " मध्ये शनिवारी रात्री दहा वाजता धाड टाकली. यावेळी पोलीस हॉटेलमध्ये घुसताच हॉटेलमधील हुक्का ओढणाऱ्यांनी मागील दरवाजातून पळ काढला, तर हॉटेल मालक अक्षय जगताप, मॅनेजर कुमार गोफणे याच्यासह तीन वेटरना ताब्यात घेतले. हॉटेल मालक अक्षय जगताप यांना हुक्का पार्लरच्या परवानगीबाबत विचारणा केली असता, त्यांनी हुक्का चालविण्याचा कोणताही परवाना नसलेचे सांगितले. हॉटेलच्या किचनमधील हुक्क्याचे डबे, इतर साहित्य जप्त केले. सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर यांनी सांगितले, होळकरवाडी गावामध्ये "जे २ के" या हॉटेलमध्ये हडपसर, हंडेवाडी, उंड्री, मगरपट्टा परिसरातील युवक-युवती हुक्का ओढत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार, शनिवारी रात्री पोलीस पथकासह धाड टाकली. घटनास्थळी पार्लर मालकासह पाच जणांना ताब्यात घेतले, तर हुक्क्याचे साहित्य जप्त केले आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: