सिंधुदुर्ग झेडपी अध्यक्ष निवडणूक: राणेंचा शिवसेनेवर गंभीर आरोप
सुरेश कौलगेकर । सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या आज होणाऱ्या निवडणुकीत जिल्हा बँकेच्या काही अधिकाऱ्यांकडून हस्तक्षेप केला जात आहे. बँकेचे कर्ज घेतलेल्या जिल्हा परिषदेच्या काही सदस्यांना संबंधित अधिकारी संपर्क करत असून जप्तीची कारवाई टाळायची असेल तर जिल्हा बँकेचे अध्यक्ष यांना येऊन भेटा अशी धमकी दिली जात आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे खासदार यांनी केला आहे. वाचा: जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा शिवसेना नेते सतीश सावंत हे भाजपच्या सदस्याना फोन करून आम्ही तुमच्यावर जप्ती येऊ देणार नाही. तुम्ही आम्हाला येऊन भेटा. तुम्हाला प्रत्येकी पंचवीस लाख देतो, असं सतीश सावंत सांगत असल्याचा आरोप राणेंनी केलाय. जिल्हा बँकेत झालेल्या भ्रष्टाचारची चौकशी लावून जे दोषी आहेत त्यांना सचिन वाझे याच्या बरोबर जेलमधे पाठवण्याचा इशाराच राणेंनी दिला आहे. राणेंपासून जिवाला धोका - सतीश सावंत सतीश सावंत यांनी मात्र हे आरोप फेटाळत राणेंवर टीकेची तोफ डागली आहे. 'नारायण राणेंचं राजकीय वजन कमी झाल्यामुळं त्यांना लोकसभेचं अधिवेशन सोडून जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडीवर लक्ष केंद्रित करावं लागलं आहे. १९९० पासून आतापर्यंत राणेंच्या एका फॅक्सवर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाची निवड होत होती. मात्र, आज राणे पितापुत्रांना जिल्ह्यात ठाण मांडावं लागलं आहे. तसंच, भाजपचे सदस्य फूटू नयेत म्हणून गेले चार दिवस आपल्या पडवे येथील रुग्णालयात जिथं रुग्ण ठेवले जातात, त्या ठिकाणी सदस्यांना नजरकैदेत ठेवण्याची वेळ राणेंवर आली आहे, असा पलटवार सावंत यांनी केला आहे. नारायण राणे यांच्यापासून आपल्या जिवाला धोका असल्याचा आरोपही सावंत यांनी केला आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: