मरिना, क्रूझ टर्मिनल आणि जल टॅक्सी; मुंबईत विकासकामांचा धडाका
म. टा. प्रतिनिधी मुंबई : राज्याची राजधानी मुंबई नगरीच्या किनारपट्ट्यांवर तब्बल ७५१० कोटी रुपयांची कामे होत आहेत. त्यामध्ये मरिनासह क्रूझ टर्मिनल, जल वाहतुकीचा समावेश आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टने यासाठी पुढाकार घेतला आहे. जागतिक स्तरावरील 'मेरिटाइम इंडिया समिट' ही समुद्री विकासाची परिषद अलीकडेच केंद्रीय जलवाहतूक मंत्रालयांतर्गत झाली. त्यामध्ये मुंबई पोर्ट ट्रस्टनेही सहभाग घेतला आहे. याच परिषदेत भरभक्कम असे सामंजस्य करार झाले. त्या माध्यमातून मुंबई शहराच्या किनारपट्ट्यांचा वाहतूक व पर्यटनाच्या धर्तीवर विकास होणार आहे. माझगाजवळील प्रिन्सेस डॉक येथील देशांतर्गत क्रुझ टर्मिनलचा विकास अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. हे टर्मिनल सुरू झाले आहे. पण ते अर्धवट अवस्थेत आहे. ते पूर्ण करण्यासाठी ७५ कोटी रुपयांचा सामंजस्य करार पोर्ट ट्रस्टने केला आहे. याच करारांतर्गत टर्मिनलवरून जल टॅक्सी सेवा सुरू केली जाणार आहे. त्याखेरीज मुंबईच्या किनारपट्टीवरील क्रुझ पर्यटनासाठी १५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. बहुचर्चित 'मरिना' प्रकल्पासाठी पोर्ट ट्रस्टने ३७० कोटी रुपयांचा सामंजस्य करार केला आहे. याखेरीज जहाज बांधणी व संबंधित कामांसाठीही तब्बल १३०० कोटी रुपयांची गुंतवणूक होत असून, तसा करार पोर्ट ट्रस्टने केला आहे. मुंबई या शहराची भौगोलिक ओळख किनारपट्टी व समुद्र अशी आहे. या नैसर्गिक साधनसंपत्तीचा सुयोग्य उपयोग मुंबईतील समुद्री पर्यटनासाठी करण्याचे मोठे नियोजन मुंबई पोर्ट ट्रस्टने हाती घेतले आहे. त्या अंतर्गतच आणखी १२ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार येत्या काळात होऊ शकतात, असे संबंधितांनी सांगितले. मुंबई ते नवी मुंबई जल टॅक्सी जल टॅक्सीसंदर्भात सामंजस्य करारांतर्गत माझगाव येथून जल टॅक्सीद्वारे आता नवी मुंबई गाठता येणार आहे. माझगाव ते बेलापूर व नेरुळसाठी पहिल्या टप्प्यात ही सेवा सुरू होणार आहे. त्यानंतर पुढील टप्प्यात रेवास व काशिद यांना जोडले जाणार आहे. याअंतर्गत १० ते १५ आसनी बोटीचा समावेश असेल. त्याचे तिकीट ४०० रुपयांपर्यंत असू शकेल, असे पोर्ट ट्रस्टच्या सूत्रांनी सांगितले.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: