महाराष्ट्रात दुचाकीवरून येत होते दोघे तरूण; सीमेवर झडती घेतली अन्...

March 11, 2021 0 Comments

अमरावती: मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात दुचाकीवरून येणाऱ्या दोघा तरुणांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे विदेशी बनावटीचे आठ पिस्तुल आढळून आले. मध्य प्रदेश पोलिसांनी महाराष्ट्राच्या सीमेवरील दातपहाडीच्या (धारणी) जंगलात ही कारवाई केली. महाराष्ट्राच्या सीमेवर दातपहाडी आणि पाचोरी असे दोन गाव जंगलात वसलेले आहेत. बऱ्हाणपूर जिल्ह्याच्या खकनार तालुक्यात ही गावे येतात. दोन्ही खेड्यांत राहणारे काही लोक अवैधपणे देशी कट्टे बनवतात. हे कारागीर मेळघाटच्या हद्दीपर्यंत येऊन पिस्तुलांची विक्री करतात. दोन दिवसांपूर्वी गुप्त खबऱ्यांकडून माहिती मिळाली. त्या आधारे खकनार पोलिसांनी दुचाकीवरून येणाऱ्या दोघांची घेराबंदी केली. दातपहाडीच्या जंगलात त्यांना रोखले. झडती घेतल्यानंतर त्यांना अटक केली. दानसिग प्यारसिंग चावला ( वय २२, रा. पाचोरी ता. खकनार), हरपालसिंग ओंकारसिंह चव्हाण ( वय २७, रा. नांदूरा खुर्द, ता. खकनार, जिल्हा बऱ्हाणपूर (मध्यप्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. दोन्ही आरोपींकडून विदेशी बनावटीचे ८ पिस्तुल जप्त करण्यात आले. दोघांनी कमरेला प्रत्येकी दोन पिस्तुल लावल्या होत्या. तर ४ पिस्तुल दुचाकीच्या सीटखाली लपवून ठेवल्या होत्या. दोन्ही आरोपींविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाच दिवस त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. पिस्तुल विक्री व्यवहार महाराष्ट्रात होणार होता, असा प्राथमिक अंदाज खकनार पोलिसांनी व्यक्त केला आहे. यापूर्वी धारणी पोलीसांकडूनही पाचोरीच्या दोन युवकांना अटक केली होती. त्यांच्याकडूनही ८ देशी कट्टे जप्त करण्यात आले होते. आरोपी हे पिस्तुल कुणासाठी आणि महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात विक्री करणार होते, याचा तपास करण्यात येत आहे. बऱ्हाणपूर जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक अभिषेक दिवाण यांनी ही माहिती दिली.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: