गडचिरोली: महिलेसह ४ जहाल नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; चकमक, खून, जाळपोळीचे अनेक गुन्हे
गडचिरोली: एका महिलेसह चार जहाल नक्षल्यांनी गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. सरकारने या चौघांवर एकूण २२ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. आत्मसमर्पित नक्षल्यांमध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. सरकारने जाहीर केलेली आत्मसमर्पण योजना, वर्षभरात विविध चकमकींमध्ये नक्षलवाद्यांना करण्यात आलेला खात्मा आणि हिंसाचाराच्या घटनांना कंटाळून आजपर्यंत जहाल नक्षली नेत्यांसह अनेकांनी आत्मसमर्पण केले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पितांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे ही संख्या वाढत आहे. कोण आहेत हे जहाल नक्षलवादी? दिनेश उर्फ दयाराम गंगर नैताम ( वय २८) : डिसेंबर २००६ मध्ये टिपागड दलममध्ये सदस्य म्हणून सामील झाला होता. फेब्रुवारी २००७ पासून टिपागड सदस्य म्हणून कार्यरत होता. त्यांनतर दलममध्ये अनेक पदे सांभाळत आक्टोबर २०२० पर्यंत भामरागड एरिया कमांडर म्हणून कार्यरत होता. त्याच्यावर चकमकीचे ११ गुन्हे , खुनाचे ६, जाळपोळीचे ३ गुन्हे दाखल आहेत. सरकारने त्याच्यावर एकूण ८ लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते. नकुल उर्फ सुखालुराम डुमा मडावी (वय ३५) : सप्टेंबर २००२ मध्ये टिपागड दलममध्ये सदस्य म्हणून सामील झाला. त्यानंतर विविध पदावर काम केले. त्याच्यावर चकमकीचे ९, खुनाचे ४, जाळपोळीचे ५ गुन्हे, आणि भूसुरूंग स्फोटाचे ९ गुन्हे दाखल असून, त्याच्यावर सरकारने ८ लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते. निला रूषी कुमरे (वय ३४) : ही नक्षली महिला नोव्हेंबर २००५ मध्ये कसनसूर दलममध्ये सामील झाली. नकुल उर्फ सुखालुराम डुमा मडावी तुकडी क्रमांक ३ सेक्शन क्रमांक १ चा कमांडर याच्यासोबल लग्न करून ते दोघेही कसनसूर दलममध्ये कार्यरत होते. निलावर चकमकीचे ३, खुनाचे ३ , जाळपोळीचे ४ गुन्हे दाखल असून, तिच्यावर सरकारने २ लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते. शरद उर्फ रमेश उर्फ गोविंदा सामजी आतला (वय २६) : जानेवारी २०११ मध्ये चातगाव दलममध्ये विविध पदांवर कार्यरत होता. त्याच्यावर चकमकीचे ६, खुनाचे २ गुन्हे दाखल असून, त्याच्यावर सरकारने ४ लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते. दलाने अतिशय प्रभावीपणे नक्षलविरोधी अभियान राबविल्यामुळे गेल्या २ वर्षांत आजपर्यंत एकूण ३७ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यात ४ डिव्हीसी, २ दलम कमांडर, २ दलम उपकमांडर, २८ सदस्य, १ जनमिलीशिया यांचा समावेश आहे. विकासकामांना आडकाठी करणाऱ्या नक्षलवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असल्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी स्पष्ट केले आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: