Ahmednagar: अटक टाळण्यासाठी तो हॉस्पिटलमध्ये दाखल झाला, अन् तिथंच…

March 31, 2021 0 Comments

म. टा. प्रतिनिधी, नगर: खुनासह अन्य गुन्हे करणाऱ्या टोळीविरोधात पोलिसांना महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यान्वये (मकोका) कारवाई केली. मात्र, या टोळीतील एक आरोपी पोलिसांच्या हाती लागत नव्हता. अखेर त्याने अटक टाळण्यासाठी रुग्णालयाचा आसरा घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली. येथील एका खासगी रुग्णालयात आरोपी दाखल झाला होता. पोलिसांनी तेथे जाऊन त्याला ताब्यात घेतले. जिल्हा रुग्णालयात आणून तपासणी केल्यावर त्याचा बनाव उघड झाला आणि त्याला अटक करण्यात आली. त्याला आश्रय देणाऱ्या हॉस्पिटलवर काय कारवाई होणार, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. सुनील फक्कड आडसरे (वय २६, रा. शेडाळा, ता. आष्टी) याला पोलिसांनी अटक केली आहे. सुमारे सहा महिन्यांपासून तो फरार होता. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके नियुक्त करण्यात आली होती. नगर आणि बीड जिल्ह्यात त्या शोध सुरू होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना आरोपी सुप्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलिस पथके पाठविली. पोलिसांना शोधाशोध सुरू केल्यावर सुप्यातील निरामय हॉस्पिटलमध्ये तो उपचारासाठी दाखल असल्याची माहिती मिळाली. मात्र, आडसरे याला गंभीर आजार नसावा, असा संशय त्याला पाहताच क्षणी आला. त्यामुळे पोलिसांनी त्याला तेथून ताब्यात घेतले. नगरच्या सरकारी रुग्णालयात आणून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. खात्री पटल्यावर त्याला नगर तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. गेल्या वर्षी वाळकी (ता. नगर) येथे ओंकार बाबासाहेब भालसिंग यांचा खून झाला होता. गावातील चौकामध्ये विश्वजीत प्रतिष्ठानच्या वतीने शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याचे काम सुरू होते. त्यावेळी ओंकार याने विरोध केला होता. त्याचा राग मनात धरुन विश्वजीत कासार (रा. वाळकी) याने व त्याच्या इतर साथीदारांनी १७ नोव्हेंबर २०२० रोजी त्याच खून केला होता. ओंकार दुचाकीवरुन घरी जात असताना, त्याला समोरुन चारचाकी वाहनाने धडक देऊन खाली पाडले. त्यानंतर लोखंडी पाईप व लाकडी दांडक्याने मारहाण करुन त्याचा खून करण्यात आला. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. पोलिसांनी गुन्हा दाखल करून गुन्ह्यातील मुख्य आरोपी विश्वजीत रमेश कासार व त्याचे चार साथीदारांना अटकही केली. त्यांच्याविरोधात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. मात्र, या टोळीतील आरोपी सुनिल आडसरे फरार झालेला होता. शेवटी त्यालाही अटक करण्यात पोलिसांना यश आले.


from Ahmednagar News | अहमदनगर बातम्या | Ahmednagar News in Marathi | Ahmednagar Local News - Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: