मुंबई: लग्नाला नकार दिल्याने गर्लफ्रेंडला धावत्या ट्रेनखाली ढकलण्याचा प्रयत्न, थरार CCTVत कैद
मुंबई: लग्नाला नकार दिल्याने चिडलेल्या तरुणाने २१ वर्षीय प्रेयसीला धावत्या ट्रेनखाली ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईतील खार रेल्वे स्थानकात घडला. सुदैवाने यात तरुणी बचावली आहे. तिच्या डोक्याला मार लागला असून १२ टाके पडले आहेत. मुंबईतील खार रेल्वे स्थानकात शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली असून, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ती कैद झाली आहे. सुमेध जाधव असे आरोपी तरुणाचे नाव आहे. तो वडाळा येथे राहतो. तरुणीला धावत्या ट्रेनखाली ढकलून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्यानंतर तो घटनास्थळावरून पसार झाला होता. अवघ्या १२ तासांच्या आत पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पीडित २१ वर्षीय तरुणी ही खार येथील रहिवासी आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी हे एकमेकांना मागील दोन वर्षांपासून ओळखत होते. ते एकाच ठिकाणी काम करत होते. त्यांच्यात चांगली मैत्री झाली. मात्र, तरूणाला दारूचे व्यसन असल्याचे काही दिवसांनी तरुणीला समजले. त्यानंतर ती आरोपीला टाळायला लागली. तरीही तो तिला त्रास देत होता. तरुणीने त्याच्याविरोधात आधीही तक्रारी केल्या आहेत. मात्र, तो तिचा पिछा सोडत नव्हता. काय घडलं त्या दिवशी? शुक्रवारी संध्याकाळी सुमेध हा तरुणीचा पाठलाग करत होता. तरुणी अंधेरी स्थानकात ट्रेनमध्ये चढली. ती खारला जात होती. तिने तिच्या आईला फोन केला. खार रेल्वे स्थानकात येण्यास सांगितले. तरुणी खार रेल्वे स्थानकात उतरली. तिथे आई भेटली. तरूण हा तिचा पाठलाग करत तिथेही पोहोचला. दोघांमध्ये रेल्वे स्थानकातच वाद झाला. मला तुझ्याशी लग्न करायचे आहे असे त्याने तिला सांगितले. मात्र, तरुणीने लग्नाला नकार दिला. सुमेधने आत्महत्या करण्याची धमकी दिली. तो धावत्या लोकलच्या दिशेने धावला. मात्र, अचानक मागे फिरला. त्याने तरुणीला फरफटत नेले. तिला ट्रेनखाली ढकलण्याचा प्रयत्न केला. तरुणीच्या आईने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. ट्रेनचा धक्का लागल्याने तरुणीच्या डोक्याला जबर मार लागला. या घटनेनंतर आरोपी तेथून पसार झाला. पोलिसांची पथके त्याच्या शोधासाठी रवाना झाली. अवघ्या १२ तासांच्या आत त्याला अटक केली. जखमी तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या डोक्याला १२ टाके पडले आहेत. आता तिची प्रकृती ठीक असून, तिला घरी सोडण्यात आले आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: