अपघातग्रस्तालाच 'त्या' नातेवाइकांनी लुटले; हॉस्पिटलला न नेता अर्ध्या रस्त्यातच सोडले

February 05, 2021 0 Comments

म. टा. प्रतिनिधी, नगर: रस्ता अपघातात जखमी झालेल्यांना इतरांनी मदत करावी, यासाठी बरेच नियम शिथील करण्यात आले आहेत. मात्र, तरीही अभावानेच नागरिक मदतीसाठी पुढे येतात. मात्र, अनेकदा जखमींच्या अंगावरील आणि वाहनातील महागड्या वस्तू चोरून नेण्याचे प्रकारही घडतात. नगरमध्ये असा नवीनच प्रकार पाहायला मिळाला. जखमीचे नातेवाइक आहोत, असे जमलेल्या गर्दीला सांगून दोघांनी त्याला उचलून नेले. मात्र, हॉस्पिटलमध्ये न नेता त्याला लुटून अर्ध्या रस्त्यातच सोडून दिले. चोरट्यांच्या या नवीन प्रकाराने पोलिसही चक्रावून गेले आहेत. नगरच्या सक्कर चौकात एका जखमी मजुराला लुटण्यात आले. कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ते बनावट नातेवाइक अद्याप हाती लागलेले नाहीत. पांडुरंग शहाजी गायकवाड (वय ५०, रा. गवळीवाडा, स्टेशन रोड) हे मजुरी करतात. सायंकाळी कामावरून सुटल्यानंतर दुचाकीवरून ते घराकडे जात होते. सक्कर चौकातून स्टेशन रोडकडे वळताना रस्त्यावर पडलेल्या खडीवरून त्यांची दुचाकी घसरली. त्यामुळे ते खाली पडले. मुका मार लागल्याने त्यांना चक्कर आली. तशा अवस्थेत ते पडून असताना तेथे बघ्यांची गर्दी झाली. काही वेळात त्या गर्दीतून दोघे जण पुढे आले. जमलेल्या लोकांना आपण त्या जखमीचे नातेवाइक असल्याचे सांगितले. यांना रुग्णालयात घेऊन जात आहोत, असू सांगून त्यांनी जखमी गायकवाड यांना उचलले. त्यांच्याच दुचाकीवर बसवून ते घेऊन गेले. गायकवाड यांच्याकडील मोबाइल फोनही त्यांनी काढून घेतला. काही अंतर पुढे गेल्यावर स्टेशन रस्त्यावरील लक्ष्मीमाता मंदिराजवळ गायकवाड यांना दुचाकीवरून खाली उतरवले. तोपर्यंत गायकवाड पुरेसे भानावरही आलेले नव्हते. काही कळायच्या आत त्यांना तेथेच रस्त्यावर सोडून बनावट नातेवाइक बनून आलेले ते दोघेही पळून गेले. जाताना गायकवाड यांची दुचाकी आणि मोबाइलही त्यांनी चोरून नेला. थोड्या वेळात घडलेला प्रकार गायकवाड यांच्या लक्षात आला. नंतर त्यांनी पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात दोन आरोपींविरूद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. दुचाकी आणि मोबाइल चोरीच्या घटना नवीन नाहीत. मात्र, अपघातात जखमी झालेल्याचे नातेवाइक असल्याचा बनाव करून लुटण्याचा हा नवीनच प्रकार आढळून आला आहे.


from Ahmednagar News | अहमदनगर बातम्या | Ahmednagar News in Marathi | Ahmednagar Local News - Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: