'महाराजांनीही रयतेचा जीव धोक्यात घालणारा निर्णय घेतला नसता'
पुणेः 'करोनाला रोखण्यासाठी शिवजयंतीसारखे उत्सव मर्यादित स्वरुपात साजरे करण्याचा निर्णय नाईलाजास्तव घ्यावा लागला आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज जरी असते तर त्यांनीही लोकांचा, रयतेचा जीव धोक्यात घालणारा निर्णय घेतला नसता,' असं राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी म्हटलं आहे. किल्ले शिवनेरीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवजयंती सोहळा साधेपणाने साजरा करण्यात आला. त्यावेळी अजित पवार बोलत होते. राज्यात करोना रुग्णसंख्या वाढत असताना आज साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती सोहळ्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. सरकारच्या या निर्णयावर विरोधी पक्षानं सडकून टीका करत आहेत. तर, यावेळी अजित पवारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण देत विरोधकांचा समाचार घेतला आहे. वाचाः 'रयतेच्या जीवाला धोका निर्माण होईल असा कोणताही निर्णय महाराजांनी घेतला नाही. महाराजांच्या जीवनातील कोणताही प्रसंग घ्या, महाराजांनी घेतलेल्या कोणत्याही निर्णयाचा आपण अभ्यास करा. त्यांनी घेतलेले निर्णय हे स्वराज्याचं हित आणि जनतेचं कल्याण डोळ्यासमोर ठेवूनच घेतलेला होता हे लक्षात येईल,' असं यावेळी अजित पवार म्हणाले. 'राज्यावर आज करोनाचं संकट आहे. जनतेच्या जीवाला असणारा धोका लक्षात घेऊन गेल्या वर्षभरात सर्व सण, उत्सव मर्यादित स्वरुपात आपण साजरे केले. राज्यातील जनतेनं देखील सर्व निर्णयांना पाठिंबा दिला म्हणून करोना नियंत्रणात आणू शकतो,' असं म्हणत अजित पवारांनी जनतेचे आभार मानले आहेत. वाचाः शिवनेरीसाठी निधी शिवनेरीसाठी २३ कोटी ५० लाखांचा निधी देण्यात आला असल्याची माहिती यावेळी अजित पवारांनी दिली. तसंच, या पैशातून दर्जेदार काम झालं पाहिजे, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं आहे. 'हा निधी आणि होणारी कामं छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आणि परिसरातील विकासासाठी आहे याची जाण, भान ठेवून कामं झाली पाहिजेत. कामाचा दर्जा आणि गुणवत्तेत कमतरता खपवून घेतली जाणार नाही,' अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: