हे तर टोलराक्षस! खेडशिवापूर टोलनाक्यावर वाहनचालकांची लूट, स्टिंग ऑपरेशनद्वारे पर्दाफाश

February 25, 2021 0 Comments

भोर: -सातारा महामार्गावरील खेडशिवापूर (ता. हवेली) या टोलनाक्यावर बनावट पावत्या देऊन वाहनचालकांची आर्थिक लूट होत असल्याचे समोर आले आहे. याबाबत एका सजग नागरिकाने स्थानिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती. पोलिसांनी टोलनाक्यावर स्टिंग ऑपरेशन केले असता, बनावट पावती देऊन टोल वसुली करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. याबाबत राजगड पोलीस ठाण्यात सात कर्मचाऱ्यांसह इतरांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेडशिवापूर टोलनाक्यावर बनावट पावत्या देऊन वाहनचालकांची लूट करून फसवणूक केल्याप्रकरणी सुदेश प्रकाश गंगावणे ((वय २५, रा. वी धोम कॉलनी, ता. वाई), अक्षय तानाजी सणस (वय २२, रा. नागेवाडी. ता. वाई, सातारा), शुभम सीताराम डोलारे (वय १९, रा. जनता वसाहत, पुणे), साई लादुराम सुतार (वय २५, रा. दत्तनगर, कात्रज), हेमंत भाटे, दादा दळवी, व सतीश मरगजे ( पूर्ण नाव व पत्ता नाही ) व इतर टोल कर्मचाऱ्यांवर राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत अभिजित वसंत बाबर ( रा. पुणे ) यांनी फिर्याद दिली असून, महामार्गावरील टोलनाक्यावरील रॅकेटवर कोणाचा वरदहस्त आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे. अभिजित बाबर हे पुण्यातून स्वतःच्या चारचाकी वाहनातून सातारा या मुळगावी १६ व २० फेब्रुवारी रोजी खेडशिवापूर टोलनाक्यावर ये-जा करताना टोल कर्मचाऱ्यांनी १९० आणि आनेवाडी टोलनाक्यावर १३० रुपयांची पावती दिली होती. अनेक वाहनचालकांना अशाच प्रकारे पावती देऊन वाहने सोडली जात होती. यावेळी बाबर यांना खेडशिवापूर व आनेवाडी टोलवरील पावतीच्या साईजबाबत संशय आल्याने त्यांनी फसवणुकीबाबत पुणे ग्रामीणचे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना याबाबत तक्रार केली होती. याबाबत शहानिशा करण्यासाठी बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास खेडशिवापूर व आनेवाडी टोलनाक्यावर स्टिंग ऑपरेशन करण्यासाठी दोन पथके गुन्हे शाखेने रवाना केली होती. गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक गंधारे, उपनिरीक्षक एस. के. पठाण, नाईक सी. एस. जाधव, अमोल शेडगे, एम.एस. भगत, ए.आर जावळे यांनी ही कारवाई केली. पुढील तपास राजगड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक निखिल मगदूम करीत आहेत. असे केले स्टिंग ऑपरेशन गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सरकारी वाहन, दोन पंचासह फिर्यादीच्या वाहनात बसून खेडशिवापूर टोलनाक्यावर सातारा बाजूकडे जाताना पैसे देऊन टोलची पावती घेतली. यावेळी टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी १९० रुपयांऐवजी पावती नसेल घ्यायची, तर १०० रुपये द्या, अशी मागणीही केली होती. मात्र फिर्यादीने १९० ची पावती टोलवरून घेतली. यावेळी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी राजगड पोलिसांच्या मदतीने टोलवरील वेगवेगळ्या लेनवरील कर्मचाऱ्यांची अंगझडती घेतली असता, त्यांच्या खिशात पावत्या आढळून आल्या. यावेळी जमा झालेल्या अनेक पावत्या बनावट असल्याचे संबधित शिफ्ट मॅनेजरने सांगितले. याबाबत टोल व्यवस्थापक अमित भाटीया यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: