मुंबईहून काशीदला दोन तासांत पोहोचता येणार
म. टा. प्रतिनिधी, मुंबई मुंबईहून रायगड जिल्ह्यातील अलीबागनजीकच्या काशीद या निसर्गरम्य सागरी किनाऱ्यास आता अवघ्या दोन तासात पोहोचणे शक्य होणार आहे. सागरी महामंडळाकडून काशिद बंदरावर ब्रेकवॉटर बंधाऱ्यासह रो-रो जेट्टी आणि उभारण्याचे काम सुरू झाले असून, यावर्षाच्या अखेरीस त्याचे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे मुंबईतील पर्यटकांना मोठा दिलासा मिळेल, अशी माहिती मेरीटाइम बोर्डाचे कार्यकारी अभियंता सुधीर देवरे यांनी नुकतीच दिली आहे. मुंबईकर पर्यटकांना काशीदला जाण्यासाठी सध्या पाच तासांचा अवधी लागतो. काशीदच्या सुंदर किनाऱ्यावर पर्यटकांना जाता यावे, यासाठी त्याठिकाणच्या समुद्राच्या लाटा थोपविण्यासाठी २०१८ला आवश्यक ब्रेकवॉटर बंधाऱ्यासह रो-रो जेट्टी, पॅसेंजर जेट्टी निर्माण करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाला पाठविण्यात आला होता. त्याला केंद्रीय पर्यावरण विभागाने मान्यता दिली आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे हा प्रकल्प रखडला होता. या कामाची सुरुवात झाली असून वर्षअखेरपर्यंत काम पूर्ण करण्याचा सागरी महामंडळाचा प्रयत्न आहे. सागरमाला प्रकल्पांतर्गत ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. यामुळे काशीद हे ठिकाण मुंबईशी जलमार्गानेही थेट जोडले जाणार आहे. काशीद येथे ७६० मीटरची ब्रेकवॉटर वॉल बांधण्याचे काम सुरू आहे. याआधी ब्रेकवॉटर वॉलच्या बांधकामासाठी ९८ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. कामास विलंब झाल्यामुळे हा खर्च ११२ कोटी रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. मुंबईहून काशीदला जाण्यासाठी मुंबईकरांना अलिबागमार्गे रस्त्याने जावे लागते. खराब रस्ते, वाहतूक कोंडी यामुळे या प्रवासासाठी सुमारे पाच तासांचा वेळ लागतो. तितकाच वेळ परतीच्या प्रवासाला लागत असल्याने मुंबईकर पर्यटक काशीदला जाण्याचे टाळतात. या प्रकल्पामुळे सागरी मार्गाने जाण्यासाठी दोन तास लागणार आहेत. त्यामुळे पर्यटकांचा वेळ वाचणार असून, काशीद परिसरातील पर्यटनाला चालना मिळेल. तसेच पर्यटकांना सागरी पर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: