बीएमसीतील पक्षनेत्याच्या भूमिकेमुळे वाढली भाजपची डोकेदुखी

February 26, 2021 0 Comments

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई एखाद्या विषयावर पक्षाची अधिकृत भूमिका जाहीर होण्याआधीच स्वतःची भूमिका रेटणारे पक्षनेते यांच्यामुळे महापालिकेत भाजपची डोकेदुखी वाढत चालली आहे. पालिका निवडणुकीच्या तोंडावर या दुहेरी भूमिका परवडणाऱ्या नसल्यामुळे पक्षनेतेपदच रद्द करावे, असा सूर भाजपमधील अनेक नगरसेवकांनी लावला आहे. पालिकेत गटनेते पद हे संबंधित पक्षातील सर्वोच्च पद आहे. भाजपने प्रभाकर शिंदे यांची गटनेतेपदी नियुक्ती केल्यानंतर, या पदाच्या स्पर्धेत असलेले विनोद मिश्रा यांना खूश करण्यासाठी वर्षभरापूर्वी त्यांची पक्षनेतेपदी निवड केली. गटनेतेपदाला वैधानिक दर्जा नसला, तरी तो त्या पक्षाचा प्रमुख या नात्याने पक्षाची भूमिका मांडत असतो. एखाद्या नगरसेवकाची समिती सदस्य म्हणून नियुक्ती करायची असेल, तर गटनेत्यांच्या सहीचे पत्र महापौरांना द्यावे लागते. पक्षात महत्त्वाचे स्थान असलेल्या या पदाला आता भाजपमधूनच मिश्रा यांचे आव्हान मिळू लागल्याने पक्षात अस्वस्थता वाढत आहे. आपल्या नगरसेवकांना अतिरिक्त विकास निधी मिळावा म्हणून भाजपमधील ज्येष्ठ नगरसेवक प्रयत्नशील असताना, मिश्रा यांनी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या विभागातील विकास निधीचा मुद्दा उपस्थित करून पक्षाच्या प्रयत्नांमध्ये अडथळे निर्माण केले. मिश्रा यांनी या निधीबाबत पालिका आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीनंतर सर्व पक्षांना मिळणाऱ्या विकास निधीत तब्बल ३२५ कोटी रुपयांची कपात झाली. स्थायी समितीचे सदस्य नसतानाही कामकाजामध्ये मिश्रा यांचा हस्तक्षेप होत असल्याचा आरोप करत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सपच्या नगरसेवकांनी भाजपकडे नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जाते. जाधव यांच्या विभागात ज्यूटच्या पिशव्या वाटण्यासाठी आणलेला प्रस्ताव आयुक्तांनी रद्द केला असला, तरी या प्रस्तावाला सर्व पक्षांनी पाठिंबा दिला आहे. मुंबईत प्लास्टिक पिशव्यांवर बंदी असल्याने सर्वच विभागात ज्यूटच्या पिशव्यांचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे फक्त जाधव यांच्या विभागातील प्रस्तावाला विरोध करणे योग्य नसल्याचे विरोधी पक्षातील नगरसेवकांचे म्हणणे आहे. भाजपने या विषयावर आधी सभात्याग करायचे ठरवले होते. मात्र जाधव यांची भूमिका ऐकून भाजपचा विरोध गळून पडला. दरम्यान, याबाबत विनोद मिश्रा यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी आपण पक्षाच्या ध्येय धोरणानुसार कामकाज करत असल्याचे स्पष्ट केले. सेनेचे पदाधिकारी पालिकेच्या तिजोरीची लूट करत असतील आवाज उठवला पाहिजे, ही पक्षाचीच भूमिका आहे. ती आपण मांडत असल्याचे मिश्रा यांनी सांगितले. काँग्रेसची भाजपवर टीका स्थायी समितीत भाजपच्या अचानक घूमजाव करण्याच्या भूमिकेवर विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पत्रकारांशी बोलताना सडकून टीका केली. भाजपचे पक्षनेते पालिकेतील कामकाजाविरोधात न्यायालयात जातात, तर दुसरीकडे स्थायी समितीत सेनेच्या हिताच्या प्रस्तावाच्या बाजूने मतदान करतात. भाजपने दोन दगडांवर पाय ठेवून, मुंबईकरांची फसवणूक करू नये, असे रवी राजा म्हणाले.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: