'रोहित पवारांना 'पोस्टर बॉय' बनवायचंय का?'
म. टा. प्रतिनिधी, नगरः राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर सातत्याने टीका करणारे भाजपचे आमदार गोपीनाथ पडळकर आता कर्जत-जामखेडचे आमदार यांच्यावरही घसरले आहेत. सोलापूर विद्यापीठातील अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारक समितीवरील पवार यांच्या नियुक्तीला पडळकर यांनी हरकत घेतली आहे. पवार यांना समितीत घेतल्यानंतर लगेच निधी मंजूर केला म्हणजे रोहित यांना स्मारक उभारणीत 'पोस्टर बॉय' बनवायचंय का? असा सवाल पडळकर यांनी उपस्थित केला आहे. () वाचाः जेजुरी गडावर झालेल्या कार्यक्रमात शरद पवार यांच्या भाषणावरून भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांनी टीका केली होती. पवार यांच्या वक्तव्यातून अहिल्यादेवी यांचा अपमान झाल्याची टीका शिंदे यांनी केली होती. त्यानंतर आता पडळकर यांनी हा मुद्दा उपस्थित करून पवारांवर निशाणा साधला आहे. अहिल्यादेवी यांचे जन्म ठिकाण असलेले चौंडी गाव ज्या कर्जत-जामखेड मतदारसंघात आहे, तेथे रोहित पवार आमदार आहेत. एका बाजूला धनगर समजाचे भाजपमधील नेते पवारांवर टीका करीत असताना दुसरीकडे राष्ट्रवादीने अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक, पुतळे या माध्यातून धनगर समाजाचा विश्वास संपादन करण्यासाठी प्रयत्न केल्याचे दिसून येते. यावरूनच आता भाजपमधील नेते पवारांना या मुद्द्यावरून टार्गेट करू लागल्याचे दिसून येत आहे. वाचाः जेजुरीच्या भाषणानंतर आता अहिल्यादेवी स्मारक समितीवरून टीका सुरू झाली आहे. यासंबंधी पडळकर यांनी म्हटले आहे, ‘सोलापूर विद्यापीठाची निर्मिती झाल्यापासून पुण्यश्लोक अहिल्यादेवींच नाव विद्यापीठाला देण्यात यावं अशी मागणी होती. पुण्यश्लोक अहिल्यादेवींवर बेगडी, नाटकी प्रेम दाखवणारे आघाडी सरकारचे निर्माते, दिग्दर्शक का गप्प होते? वर्षभरापासून पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर विद्यापीठात अहिल्यादेवींचा अश्वारुढ १८ फुटी पुतळा व्हावा म्हणून त्यांच्या कार्यावर प्रेम करणारा बहुजन समाज सातत्याने प्रयत्न करत होता. या स्मारकासाठी ३ कोटींची मागणी आहे. त्यापैकी दीड कोटी विद्यापीठ व दीड कोटी सरकार असा निधी उपलब्ध करुन देणार होते. विद्यापीठ एक कोटीचा निधी द्यायला तयार होतं, त्यांनी पाया खणून बांधकामाला सुरुवात केली पण हे सरकार निधी देत न्हवतं. आता त्यांचे धाबे दणाणले आहेत. हे 'पई पाव्हण्यांचं सरकार' याही स्मारकाचा वापर फक्त राजकारणासाठी करतंय हे स्पष्टपणे दिसतंय. कारण पहिली स्मारक समिती सुडबुद्धीने बरखास्त करून आता या समितीत एकाच पक्षाचं वर्चस्व कसं राहिल? याची सोय लावली आहे, असं पडळकर यांनी म्हटलं आहे. वाचाः स्मारकासाठी, नामांतरासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आलं आहे. सोलापूरचा आणि रोहित पवारांचा काहीही संबंध नसताना त्यांना स्मारक समितीत स्थान दिलंय. त्यांना समितीवर घेतल्याघेतल्या निधी मंजूर केला. म्हणजे रोहित पवारांना अहिल्यादेवी स्मारक उभारणीत तुम्हाला 'पोस्टर बॉय' बनवायचंय का? मुळात स्मारक समितीमध्ये राज्यातील सर्वात ज्येष्ठ नेते, राजकारणातील आदर्श भाई गणपतरावजी देशमुख ज्यांनी विधानसभेत ११ वेळा प्रतिनिधित्व केल त्यांचे नाव ७ व्या क्रमांकाला टाकून नेमकं तुम्हाला काय साध्य करायच होतं. मंत्री उदय सामंत यांना भेटताना सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे व अन्य सदस्य यांना का सोबत घेऊन गेला नाहीत? रोहित पवारांचं धोरण म्हणजे 'आयजीच्या जीवावर बायजी उधार'.. आपल्या नातवाला लाँच करण्याची कितीही धडपड? जिथं जिथं अहिल्यादेवींचं नाव आहे, तिथं तिथं तुम्ही श्रेय घ्यायला येत आहात हे जेजुरी गडाच्या प्रकरणावरून समस्त बहुजन समाजाला कळलं आहे. समस्त बहुजन समाजाने हा प्रस्थापितांचा डाव ओळखलाय,' असेही पडळकर यांनी म्हटले आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: