बार्कच्याच महिला अधिकाऱ्याकडून टीआरपी घोटाळा उघड, पण...
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई 'ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल अर्थात बार्कने नि:पक्षपातीने सर्व वाहिन्यांचे टीआरपी मोजून ते जाहीर करणे अपेक्षित असताना या कामात गैरव्यवहार सुरू असल्याचे आणि काही वाहिन्यांच्या फायद्यासाठी टीआरपीमध्ये फेरफार केला जात असल्याचे बार्कच्याच एका महिला अधिकारीने अडीच वर्षांपूर्वी आपल्या संस्थेतील वरिष्ठांच्या निदर्शनास आणले होते. हा सर्व गैरव्यवहार बार्कचा तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता हा रिपब्लिक टीव्हीसाठी करत असल्याचेही नंतर तिच्या लक्षात आले. मात्र, तिच्या तक्रारीवर कारवाई करण्याऐवजी तिलाच बाजूला करण्यात आले', असा युक्तिवाद मुंबई पोलिसांतर्फे विशेष सरकारी वकील अॅड. शिशिर हिरे यांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात केला. 'टीआरपीच्या कथित घोटाळ्यात इतर सर्व १४ आरोपींना कनिष्ठ न्यायालयाकडून जामीन मिळालेला असताना केवळ मलाच मिळालेला नाही', असे म्हणत दासगुप्ताने जामीन अर्ज केला आहे. त्याविषयी न्या. प्रकाश नाईक यांच्यासमोर जवळपास अडीच तास सुनावणी झाली. मात्र, ती अपूर्ण राहिल्याने न्यायालयाने मंगळवारी (आज) पुन्हा सुनावणी ठेवली. 'या प्रकरणाचा तपास फौजदारी दंड संहितेच्या कलम १७३(८) अन्वये अजूनही सुरू आहे. त्याअंतर्गत बार्कमधीलच पेखम बसू (३७) या साक्षीदाराचा जबाब पोलिसांनी मागील महिन्यात कलम १६४(५) अन्वये न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवला आहे. ऑगस्ट-२०१६ ते ऑक्टोबर-२०२० या कालावधीत पेखम ही बार्कमध्ये उपमहाव्यवस्थापक या पदावर कार्यरत होती. मार्केट अॅनलिटिक्स टीमचा प्रमुख आजारी असल्याने २०१७मध्ये ऑगस्ट-सप्टेंबर या कालावधीत पेखमवर तात्पुरत्या स्वरुपात ती जबाबदारी देण्यात आली होती. त्यावेळी तिला वाहिन्यांच्या टीआरपीमध्ये जाणीवपूर्वक फेरफार केला जात असल्याचे आढळले. ही बाब तिने कंपनीचा सीओओ रोमेल रामगढिया व एचआर प्रमुख मानशीकुमार यांच्या निदर्शनास आणली. मात्र, रोमेलने जेवढे काम दिले आहे, तेवढेच करण्याचा सल्ला तिला दिला. त्यानंतर रोमेलने तिला त्या विभागातून बाजूला केले. रिपब्लिक टीव्हीला क्रमांक एकवर यायचे असल्याने या वाहिनीकडून गैरप्रकार सुरू आहेत आणि बार्कचा सीईओ पार्थो दासगुप्ताकडूनच टीआरपीमध्ये फेरफार करण्यात येत आहेत, अशी माहितीही पेखमला कळली. तिच्यावर तक्रारीवर कोणीही काहीच कारवाई केली नाही, असे पेखमने जबाबात नमूद केले आहे', असे अॅड. हिरे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. तसेच या घोटाळ्यात पार्थोनेच रिपब्लिकच्या फायद्यासाठी घोटाळा केल्याचे पुरावे आहेत, असा युक्तिवादही त्यांनी मांडला. तत्पूर्वी, 'पोलिसांनी ३० दिवसांच्या आतच आरोपपत्र दाखल केले असून इतर सर्व १४ आरोपी जामिनावर बाहेर आहेत. पोलिसांनी सहा दिवसांच्या पोलिस कोठडीत पार्थोची पूर्ण चौकशी केली असून सर्व साहित्येही जप्त केलेली आहेत. पार्थोचे वार्षिक उत्पन्नच दोन-अडीच कोटी रुपये असताना आणि त्याविषयी प्राप्तिकर विवरणपत्रेही भरलेली असताना त्याने ५० हजार रुपयांचे घड्याळ आणि काही चांदीचे दागिने अर्णव गोस्वामीने दिलेल्या पैशांतून घेतल्याचा निराधार आरोप पोलिसांनी केला आहे. पोलिसांना अधिक तपास करायचा असल्यास तो नव्याने पुरावे समोर आले तरच करता येतो. मागील ५२ दिवसांपासून गजाआड असलेल्या पार्थोची प्रकृती बिघडत असल्याने त्याला जामीन मंजूर करावा', असा युक्तिवाद ज्येष्ठ वकील अॅड. आबाद पोंडा यांनी मांडला.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: