क्वारंटाइन असलेले चार प्रवासी हॉटेलमधून पळाले; महापौर चिडल्या!
म. टा. प्रतिनिधी, परदेशातून आल्यानंतर सांताक्रूझ पूर्व येथील हॉटेल साई इनमध्ये विलगीकरणात ठेवलेल्या चार प्रवाशांनी पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराबद्दल महापौर यांनी संताप व्यक्त केला असून हॉटेल मालक व संबंधित प्रवाशांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. आखाती व इतर देशांमधून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना विलगीकरणासाठी हॉटेल साई इनमध्ये ठेवले जाते. महापौर किशोरी पेडणेकर व उपमहापौर अॅड. सुहास वाडकर यांनी बुधवारी अचानक या हॉटेलची पाहणी केली. तेव्हा हॉटेलमधून चार प्रवासी पळून गेल्याचे निदर्शनास आले. याबाबत महापौर म्हणाल्या, 'ही बाब अत्यंत गंभीर असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यास महापालिका अधिकारी व पोलिसांना सांगितले आहे.' वाचा: कुठल्याही परिस्थितीत या चार प्रवाशांना शोधून त्यांचे विलगीकरण करणे अत्यावश्यक असून त्यांचा तातडीने शोध घेण्याचे निर्देश महापौरांनी दिले आहेत. अन्य देशांमध्ये करोनाची स्थिती भयंकर असून त्यानंतरही प्रवासी अशा प्रकारे वागत असतील आणि हॉटेलमालक त्यांना सहकार्य करत असेल तर ही चिंतेची बाब आहे. याबाबत पालिका आयुक्तांना माहिती देऊन सर्व हॉटेल मालकांना सक्त ताकीद देण्याचे निर्देश देणार असल्याचे महापौरांनी सांगितले. वाचा: पालिका कर्मचाऱ्यांनी संबंधित प्रवाशांना हॉटेलमध्ये सोडल्यानंतर त्यांची संपूर्ण जबाबदारी हॉटेल मालकावर असते. घडलेल्या प्रकाराबाबत हॉटेल मालकाने संबंधित पोलिस ठाणे व पालिकेला कळविणे गरजेचे होते, परंतु त्यांनी कुणालाही कळविले नाही, असे महापौर म्हणाल्या. पळून गेलेल्या प्रवाशांपासून इतर जण बाधित होण्याची शक्यता नाकारता येत नसून या प्रकारचे धाडस कोणीही करू नये, यासाठी संबंधितांवर कडक कारवाई करणार असल्याचे महापौरांनी सांगितले.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: