पुण्यात राहायचे, स्थानिकांना हाताशी धरून 'ती' विदेशी टोळी...

February 02, 2021 0 Comments

म. टा. प्रतिनिधी, नगर : सोशल नेटवर्किंग साइटवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून नंतर खरेदीच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या एका नायजेरियन टोळीच्या नगरच्या सायबर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. मूळचे नायजेरियाचे असलेले आरोपी पुण्यात राहून अशा प्रकारचे गुन्हे करीत होते. आयुर्वेदिक उत्पादनांसाठी कच्चा माल खरेदी करण्याच्या बहण्याने या टोळीने नगरमधील एका हॉटेलचालकाला सुमारे १४ लाख रुपयांना गंडा घातला होता. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. नगरच्या सायबर क्राइम पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कामगिरी केली आहे. पोलिसांनी सांगितले की, ओंकार मधुकर भालेकर (वय ३० रा. केडगाव नगर) हे हॉटेलचालक आहेत. त्यांची जुलै ते नोव्हेंबर २०२० या काळात अशा पद्धतीने फसवणूक झाली आहे. आरोपींनी भालेकर यांच्याशी फेसबुकवरुन मैत्री केली. भारतातील हर्बल प्रॉडक्ट कंपनीकडून आयुर्वेदिक कच्चा माल कमी किंमतीत खरेदी करुन त्यातून लाखो रुपये मिळविण्याचे आमिष भालेकर यांना दाखविले. याची खात्री पटविण्यासाठी सरकारी कार्यालयाचे बनावट ई- मेल आयडी तयार करून त्यावरून भालेकर यांच्याशी संपर्क केला. त्यांना खोटी कागदपत्रे पाठविण्यात आली. त्यानंतर वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे भरायला सांगितले गेले. भालकेर यांनी एकूण १४ लाख, १७ हजार रुपये आरोपींनी दिलेल्या वेगवेगळ्या खात्यात भरले. त्यानंतर मात्र फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी सायबर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत तपास सुरू केला. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या पथकाने तांत्रिक तपास सुरू केला. पोलीस उपनिरीक्षक प्रतिक कोळी यांनी तपासासाठी दोन पथके तयार केली. तांत्रिक तपासात आरोपींचा शोध घातला. त्यानुसार पुण्यात जाऊन वेगवेगळ्या ठिकाणांहून चार आरोपींना अटक करण्यात आली. स्टेनले स्मित (रा. गुरव पिंप्री, ) नीलम गरीष गोहेल उर्फ निशा शहा (गुरव प्रिंपी, पुणे), अलेक्स ओडूडू उर्फ मार्क (रा. गुरव पिंप्री, पुणे) व अलेन उर्फ मार्केल (रा. गुरव पिंप्री, पुणे) यांना अटक करण्यात आली. आरोपी मूळचे नायजेरिया देशातील आहेत. पुण्यात येऊन एका स्थानिकाच्या मदतीने ते गुन्हे करीत होते. फेसबुकवर वेगवेगळ्या क्षेत्रांतील लोकांशी मैत्री करायची, त्यांना त्यांच्या व्यावसायाशी सुसंगत व्यवसाय वाढीची फसवी योजना सादर करायची, खात्री पटविण्यासाठी संबंधित सरकारी विभागाची खोटी कागदपत्रे पाठवायची आणि नंतर कामासाठी पैसे मागायचे, अशी त्यांची गुन्हे कारण्याची पद्धत आहे. नगरचे भालेकर यांना आयुर्वेदिक तेलासाठीचा कच्चा माल पुरवून व्यावसायात सहभागी होण्याचे निमंत्रण देऊन त्यांची फसवणूक करण्यात आली. या आरोपींकडून वेगवेगळ्या ८ बँकांचे एटीएम कार्ड आणि क्रेडिट कार्ड जप्त करण्यात आले. आरोपींची सहा वेगेवेगळ्या बँकांत खाती असून त्यावर पैसे भरण्यास सांगितले जात असे. त्यांच्याकडून दहा मोबाइल, दहा सिमकार्ड, लॅपटॉप, बँकांची चेक बुक्स जप्त करण्यात आली आहेत. त्यांची पोलीस कोठडी घेण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, पोलीस उपनिरीक्षक प्रतिक कोळी, योगेश गोसावी, उमेश खेडकर, दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपींनी पुण्यात येऊन येथील स्थानिक बँकेत खाती उघडली. येथील मोबाइल सिमकार्ड वापरली. त्यामुळे लोकांना फारसा संशय येत नव्हता. यासाठी त्यांनी स्थानिकांची मदत घेतल्याचेही दिसून येते. आरोपींनी या गुन्ह्याची कबुली दिली आहे. आता त्यांनी आणखी काही गुन्हे केले का, याचा तपास सुरू आहे.


from Ahmednagar News | अहमदनगर बातम्या | Ahmednagar News in Marathi | Ahmednagar Local News - Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: