गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना सेना, राष्ट्रवादीत रेड कार्पेट
शरद पवार, अंबरनाथ, बदलापूर नगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर अनेक आजी, माजी लोकप्रतिनिधींकडून पक्षांतर होत असतानाच या पक्षांतरांच्या घडामोडीत शहरातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांसाठीही राजकीय पक्षांनी रेड कार्पेट अंथरले आहे. काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीत गृहनिर्माण मंत्र्यांच्या उपस्थितीत, तर नुकताच शिवसेनेत जिल्हा नेत्यांच्या उपस्थितीत राजकीय हत्येच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींना प्रवेश देण्यात आला. या प्रवेशामागे शह-काटशहाचे राजकारण करण्याकडेच लोकप्रतिनिधींचा कल असल्याचे दिसत आहे. त्यामुळे शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. अंबरनाथ, बदलापूर नगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला असून मार्च महिन्यात आचारसंहिता आणि एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मतदान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केवळ दीड महिन्याचा अवधी असल्याने शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शहरातील अनेक आजी, माजी लोकप्रतिनिधीकडून सोयीनुसार पक्षांतर केले जात आहे. मात्र, यंदा लोकप्रतिनिधींसह छोटे गुन्हेगार, शहरातील महत्त्वाच्या हत्यांमधील आरोपी आणि अन्य गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांचाही राजकीय झेंडा हाती घेण्याकडे कल वाढत आहे. काही महिन्यांपूर्वी एका हत्येतील आरोपी भालचंद्र भोईर याने गृह राज्यमंत्री यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर रेशनिंग धान्याच्या काळाबाजारात सहभाग असणाऱ्या दोन पदाधिकाऱ्यांना शिवसेनेत प्रवेश दिला गेला होता. अंबरनाथ शहरात ८ नोव्हेंबर २००२मध्ये आरपीआयचे नेते नरेश गायकवाड यांची त्यांच्याच कार्यालयात गोळया घालून हत्या केल्याचा आरोप असलेल्या इंदीन सैय्यद आणि पापा सैय्यद या दोघांना शिवसेनेत गोपळा लांडगे यांच्या उपस्थितीत प्रवेश देण्यात आला आहे. शहरातील अनेक लहान, मोठ्या गुन्हेगारांचे सर्वच राजकीय पक्षांत स्थानिक लोकप्रतिनिधींकडून स्वागत केले जात आहे. त्यामुळे आधीच राजकीय रक्तरंजित इतिहास असलेल्या अंबरनाथ शहरात सुशिक्षित चारित्र्यवान उमेदवारांऐवजी गुन्हेगारांना राजकीय पक्षात प्रवेश देण्याकडे असलेला कल शहराच्या विकासासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत अंबरनाथ शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांना विचारले असता, त्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला. आम्ही प्रवेश दिलेले पदाधिकारी, सध्या जामिनावर आहेत. एखादी व्यक्ती गुन्हा केल्यानंतर सामाजिक जीवनात सुधारण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला संधी द्यायला हवी. मात्र, त्यानंतरही त्याच्याकडून गुन्हेगारी कृत्य घडल्याचे निदर्शनास आले तर त्यावर पक्ष कारवाई करेल. आनंद परांजपे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी वरिष्ठांच्या आदेशानुसारच हा पक्षप्रवेश झाला असून मी केवळ या पक्षप्रवेशावेळी हजर होतो. -डॉ. बालाजी किणीकर, आमदार
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: