अहमदनगर: चोरट्यांचे पोलिसांनाच आव्हान; वायरलेस कक्ष फोडून चोरी
म. टा. प्रतिनिधी, नगर : ज्या बिनतारी संदेश यंत्रणेच्या माध्यमातून पोलीस कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी संपर्कात राहतात, त्यावरच चोरांनी डल्ला मारला आहे. तालुक्यात घारगाव येथील एका मंदिराच्या आवारात असलेला पोलिसांचा बिनतारी संदेश (वायरलेस) यंत्रणेचा कक्ष चोरट्यांनी फोडला.आतील सुमारे पावणे तीन लाख रुपयांची यंत्रसामुग्री चोरून नेली. याचा तपास करून आरोपींना अटक करण्याचे आव्हान आता पोलिसांपुढे आहे. पोलिसांच्या आपसांतील संदेशाची देवाण-घेवाण वायरलेसच्या माध्यमातून होते. जिल्ह्याचे मुख्यालय आणि नियंत्रण कक्ष नगर शहरात आहे. मात्र नगर जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार मोठा आहे. शिवाय डोंगराळ भाग असल्याने नगर शहर आणि चांदबीबी महालावरील मनोऱ्यावरून सर्वत्र संपर्क होऊ शकत नाही. त्यामुळे ठिकठिकाणी सहक्षेपक केंद्र (रिलेस्टेशन) आहेत. संगमनेर तालुक्याच्या डोंगराळ भागासाठी असेच एक रिलेस्टेशन घारगावमधील जवळेबाळेश्वर मंदिराच्या परिसरात आहे. तेथील एका खोलीत पोलिसांची ही यंत्रणा बसविण्यात आलेली आहे. सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी या केंद्रावरच डल्ला मारला. मंदिरांचे गेट तोडून आत प्रवेश केला. आतील वायरलेस रिलेस्टेशनचा दरवाजाही तोडला. केंद्रातील दोन रिपिटर, बॅटऱ्या, इथरनेट राऊटर, माक्रोवेव्ह लिंक अशी यंत्रणा चोरून नेली. सुमारे ३ लाख ७२ हजार रुपयांची ही यंत्रणा आहे. तिचे नुकसान झाल्याने या भागातील संपर्क विस्कळीत झाला. मंदिर आणि रिलेस्टेशनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्यांचेही चोरट्यांनी नुकसान केले. मात्र, या कॅमेऱ्यांत चोरटे कैद झाले आहेत. चार जणांनी ही केल्याचे त्यावरून दिसून येत आहे. मंदिरातही चोरट्यांनी उचकापाचक केल्याचे दिसून येत आहे. मंदिरात शोधाशोध करून झाल्यावर चोरटे बिनतारी संदेश यंत्रणेच्या कक्षात चोरी करण्यासाठी गेल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणी हवालदार उल्हास बाबूराव बढे यांनी फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. नगरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. त्यांच्या मदतीने चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. मात्र, अद्यापपर्यंत ठावठिकाणा लागू शकला नाही.
from Ahmednagar News | अहमदनगर बातम्या | Ahmednagar News in Marathi | Ahmednagar Local News - Maharashtra Times
0 Comments: