'त्याने' शेतात पिकवली अफू, पण पोलिसांना सुगावा लागलाच!

February 26, 2021 0 Comments

म. टा. प्रतिनिधी, नगर: करोनाच्या काळात पोलिसांचे दुर्लक्ष होईल, असा अंदाज बांधून तालुक्यात एका शेतकऱ्याने आपल्या शेतात अफू पिकवली. पण पोलिसांना याचा सुगावा लागलाच. पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांनी छापा मारून एक लाख ७० हजार रुपयांची अफूची झाडे जप्त केली. आरोपी वासुदेव महादेव काळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली. जामखेड तालुक्यातील जातेगावच्या काळेवस्तीवर ही केली होती. वस्तीपासून जवळच असलेल्या शेतात काळे याने अफूची लागवड केली होती. पीकही जोमात आले होते. मात्र, जामखेडचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना याची माहिती मिळाली. माहितीची खातरजमा करून त्यांनी छापा घालण्याचे नियोजन केले. गुरूवारी सायंकाळी पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी तेथे छापा मारला. काळेच्या शेतातून ५६ किलो वजनाची झाडे जप्त करण्यात आली होती. बोंडे आल्याच्या अवस्थेत हे पीक होते. त्याची किंमत सुमारे एक लाख ७० हजार रुपये होते. पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ती जप्त केली. जामखेडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनीही घटनास्थळी भेट दिली. त्यांच्या उपस्थितीत कायदेशीर प्रक्रिया करण्यात आली. पोलीस पथकात संजय लाटे, संदीप आजबे, संग्राम जायभाय, आबासाहेब अवारे, विजय कोळी सचिन पिरगळ, संदीप राऊत, अविनाश ढेरे यांचा समावेश होता. खात्री करुन घेतल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता, आरोपी वासुदेव महादेव काळे (रा. काळे वस्ती, जातेगाव) याने त्याच्या मालकीच्या गट क्रमांक १०७७ मधील शेतात ५६ किलो वजनाची हिरव्या रंगाची बोंडे व पाने असलेली १ लाख ६९ हजार ८१५ रुपये किंमतीची अफूची झाडे लावली असल्याचे आढळून आले. त्यानुसार पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी या ठिकाणी छापा टाकून सर्व झाडे जप्त केली असून आरोपीस अटक केली आहे. अफूच्या लागवडीवर बंदी आहे. तरीही काळे याने वस्तीच्या जवळच बेकायदेशीरपणे अफूची शेती केल्याचे आढळून आले, त्याच्याविरूद्ध अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतात पिकविलेली ही अफू तो कोठे विकणार होता? शेतकरी स्वत: हे पीक घेतात की, त्यांना यासाठी कोणी प्रोत्साहन देऊन हा व्यवसाय करत आहे, याचा तपास पोलीस करीत आहेत.


from Ahmednagar News | अहमदनगर बातम्या | Ahmednagar News in Marathi | Ahmednagar Local News - Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: