प्रामाणिक पुणेकरांना दिलासा; महापालिकेनं घेतला 'हा' निर्णय
म. टा. प्रतिनिधी, आगामी वर्षातील महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने पुणे महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने प्रामाणिक मिळकत करदात्यांना पुढील वर्षीच्या बिलांमध्ये १५ टक्के सवलत (सरकारचे कर वगळता) देण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी मिळकतकरात सुचविलेली अकरा टक्के करवाढ फेटाळून प्रामाणिकपणे आणि वेळेत मिळकतकर भरणाऱ्या नागरिकांना १५ टक्के सवलतीचा दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आला. वाचा: करोनाच्या संकटात सर्व उद्योग-व्यवसाय बंद असताना आर्थिक परिस्थिती गंभीर असतानाही प्रामाणिक करदात्यांनी वेळेत मिळकतकर भरून महापालिकेच्या उत्पन्नात भर टाकली होती. अशा निवासी मिळकती असलेल्या करदात्यांना पंधरा टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या करदात्यांनी गेल्या वर्षी १ एप्रिल ते ३० सप्टेंबर यादरम्यान कर भरला आहे. त्यांना ही सवलत लागू होणार आहे. ही सवलत मिळविण्यासाठी आगामी आर्थिक वर्षातील मिळकतकर हा मे २०२१अखेरपर्यंत भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या पुणेकरांना सवलत देण्याचा निर्णय घेतला असून महापालिकेकडून आकारण्यात येत असलेल्या करांमध्ये ही सवलत असणार असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने आणि सभागृह नेते गणेश बीडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. अशी मिळणार सूट महापालिका नियमितपणे कर भरणाऱ्या निवासी मिळकतकरधारकांना दोन प्रकारे सवलत देते. ज्या मिळकतींची कररक्कम ही २५ हजार रुपयांपर्यंत आहे, त्यांना दहा टक्के, तर २५ हजारांच्या पुढे कर असलेल्या मिळकतींना पाच टक्के सवलत देण्यात येते. नव्याने घेतलेल्या निर्णयामुळे आता १ एप्रिल ते ३० सप्टेंबरदरम्यान प्रामाणिकपणे कर भरलेल्या सर्व मिळकतधारकांना सरसकट १५ टक्के सलवत मिळणार आहे. मिळकतकरामध्ये १४ प्रकारचे कर वसूल करण्यात येतात. त्यातील दहा कर हे महापालिकेशी तर उर्वरित चार कर हे सरकारशी संबंधित असतात. ही सवलत केवळ महापालिकेच्या करांसाठी असणार आहे. सरकारच्या करांमध्ये सवलत देण्यात येणार नसल्याचे महापौर मोहोळ यांनी स्पष्ट केले. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: