मुंबई महापालिका निवडणूक: शिवसेनेनं केले पत्ते खुले

February 04, 2021 0 Comments

म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबई महापालिकेची निवडणूक एका वर्षावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष सर्वशक्तिनिशी कामाला लागले आहेत. काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. तर भाजपने मुंबईच्या महापौरपदावर दावा ठोकला आहे. त्यापाठोपाठ सत्ताधारी शिवसेनेनेही शड्डू ठोकला असून, पालिकेवर पुन्हा स्वबळावर भगवा फडकविण्याचा निर्धार करीत १५० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. (BMC Election 2022: Aims To Win 150 Seats) पालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून, सर्वच राजकीय पक्षांनी आपापली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. राज्यात महाविकास आघाडी असली तरी पालिकेत आ तीन पक्षांमध्ये आघाडी नाही. त्यामुळे पालिका निवडणुकीत आम्ही स्वबळावर निवडणूक लढवू शकतो, असा दावा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केला आहे. तर शिवसेनेच्या कारकिर्दीत पालिकेत भ्रष्टाचाराने कळस गाठल्याचा आरोप करत भाजपने सेनेला सत्तेवरून खाली खेचण्याची तयारी सुरू केली आहे. या राजकीय सुंदोपसुंदीत आत्तापर्यंत मागे असलेल्या शिवसेनेनेही आपले पत्ते खुले केले आहेत. घाटकोपर पूर्व येथे नुकताच खासदार, आमदार, नगरसेवक, शाखाप्रमुख आणि इतर पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. त्यात आगामी पालिका निवडणुकीत स्वबळावर १५० जागा जिंकण्याचा निर्धार करण्यात आला. शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी पालिकेच्या निवडणुकीत शिवसैनिकांनी मतभेद बाजूला ठेवून पक्षाच्या उमेदवारांना बहुमताने निवडून दिल्यास शिवसेना १५० जागा सहज जिंकेल आणि पुन्हा एकदा पालिकेवर भगवा फडकेल, असा आत्मविश्वास व्यक्त केला. तर आमदार रवींद्र वायकर यांनी 'राज्यात सत्ता आपली आणि मुख्यमंत्रीही आपलेच असल्याने अधिक जोमाने विकासकामे करा, निवडणुकीत त्याच्या जोरावर मते मिळवा आणि शिवसेनेची सत्ता पुन्हा कायम राखा', असे आवाहन शिवसैनिकांना केले. बूथनिहाय माहिती आमदार सुनील प्रभू यांनी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने बनवलेली गटप्रमुख पुस्तिका व त्यात प्रत्येक बूथमधील माहिती दिली. पुढील बैठकीत शाखानिहाय गटप्रमुखांना भेटून त्यांच्याशी निवडणुकीबाबत चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी, विभागप्रमुख राजेंद्र राऊत आणि विभागसंघटक भारती बावदाने यांनी शिवसेना सदस्य नोंदणी, मतदार नोंदणी, संघटना बांधणीबाबत शाखानिहाय माहिती सेनेच्या वरिष्ठ नेत्यांना सादर केली.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: