धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या महिलेवर कारवाई करा; भाजपची मागणी
मुंबईः राज्याचे सामाजिक न्यायमंत्री यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मानं तक्रार मागे घेतली आहे. रेणू शर्मानं तक्रार मागे घेतल्यानंतर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आक्रम भूमिका घेतली आहे. बॉलिवूडमध्ये काम मिळवून देतो असं सांगून धनंजय मुंडे यांनी आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप हिनं केला होता. त्यानंतर या प्रकरणानं राजकीय वळण घेतलं होतं. तसंच, रेणू शर्मा ही ब्लॅकमेलर असल्याचा आरोपही केला जात होता. पोलिसांकडून याबाबत चौकशी सुरु असतानाच रेणू शर्मानं माघार घेतली असून तक्रार मागे घेतली आहे. रेणू शर्मानं तक्रार मागं घेतल्यानंतर चित्रा वाघ यांनी बलात्कारासारखा गंभीर आरोप धनंजय मुंडेवर करत आता तक्रार मागे घेणाऱ्या रेणू शर्मांवर खोटे आरोप केल्याप्रकरणी IPC192 नुसार तात्काळ कारवाई पोलिसांनी करावी, अशी मागणी केली आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करत रेणू शर्मावर निशाणा साधला आहे. खोटे आरोप करणं, खोटे गुन्हे दाखल करणं चुकीचंच आहे. खोट्या आरोपांमुळं राजकीय कार्यकर्ता असूदे किंवा सामान्य माणूस तो उध्द्वस्त व्हायला वेळ लागत नाही, आणि अशाप्रकारे जर महिला खोटे आरोप- गुन्हे दाखल करत असतील तर त्यामुळं खऱ्या पीडित महिलांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदलतो. हे समाजाच्या हिताचं नाहीये. त्यामुळं मुंबई पोलिसांनी खोटे आरोप करणाऱ्या रेणू शर्मावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी वाघ यांनी केली आहे. काय आहे प्रकरण? सोशल मीडियाच्या माध्यमातून रेणू शर्मानं धनंजय मुंडे यांच्यावर हे आरोप केले होते. रेणू शर्माची मोठी बहीण करुणा शर्मा हिच्यासोबत धनंजय मुंडे यांचे संबंध असल्याचा आरोपही तिनं केला होता. त्यामुळं राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. करुणा शर्मा हिच्याशी संबंध असल्याची कबुली स्वत: मुंडे यांनी दिली होती. तसंच, आपल्या कुटुंबीयांना व मित्रमंडळींना देखील याची कल्पना असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र, रेणू शर्मा हिनं केलेल्या बलात्काराच्या आरोपांमुळं ते अडचणीत आले होते. त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणीही विरोधकांनी केली होती.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: