पुण्यातील शिवसेना नेत्याचा वादग्रस्त मेसेज व्हॉट्सअॅपवर व्हायरल
म. टा. प्रतिनिधी, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांकडून निधी गोळा होत असल्याचे आरोप सुरू असतानाच, 'तो नेता कोण आहे' आणि 'तो कोणाचा पंटर आहे,' अशी पोस्ट जिल्ह्यातील शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्याने 'व्हॉट्सअॅप'च्या एका ग्रुपवर केल्याने एकच खळबळ उडाली. आपली चूक लक्षात येताच काही वेळानंतर संबंधित नेत्याने ती पोस्ट नष्ट केली. मात्र, तोवर 'स्क्रीन शॉट' वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाल्याने नव्या विषयाला तोंड फुटले. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून विविध पक्षांकडून विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठका घेण्यात येत आहेत. त्याबाबत नुकतीच एक बैठक पार पडली. त्या बैठकीत पुण्याची जबाबदारी असलेल्या शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यासमोर कार्यकर्त्यांनी काही व्यथा मांडल्या. ऐन निवडणुकीच्या तोंडावर अन्य पक्षांतून आलेल्यांना उमेदवारी दिली जाते, येथपासून ते आम्ही निवडणुकीची तयारी करायची की नाही असे अनेक मुद्दे मांडण्यात आले. त्यातच काही इच्छुकांकडून निधी गोळा करण्यात आल्याची बाब काहींनी बैठकीत मांडल्याचे सूत्रांनी सांगितले. समाजमाध्यमांतही त्याचे पडसाद उमटले. त्या पार्श्वभूमीवर नेते-कार्यकर्त्यांचा सहभाग असलेल्या एका 'व्हॉट्सअॅप' ग्रुपवर त्याची चर्चा सुरू झाली. वाचा: हा नेता नेमका कोण, अशी विचारणा एकाने केली. त्यावर जिल्ह्यातील शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्याने थेट एका नेत्याच्या नावाची पोस्ट केली; इतकेच नव्हे, तर 'तो अन्य एका फायरब्रँड वरिष्ठ नेत्याचा पंटर आहे,' अशीही पुस्ती जोडली. वरिष्ठ नेत्यांच्या अशा थेट पोस्टमुळे साहजिकच खळबळ उडाली आणि काही मिनिटांतच ती पोस्ट डिलीटही झाली. मात्र, तोपर्यंत काही 'सजग' आणि 'तंत्रस्नेही' मंडळींनी त्या पोस्टचे 'स्क्रीन शॉट' शहरभर व्हायरल केली होती. लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर सर्वच पक्षांमध्ये नवी समीकरणे उदयास आली असून, काहीजण नाराज होऊन मुख्य प्रवाहापासून बाजूला गेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. त्यामुळे गटबाजी आणि आरोप-प्रत्यारोपांनाही तोंड फुटले आहे. यापूर्वी पैशांची मागणी केल्याच्या तक्रारींच्या 'ऑडिओ क्लिप' व्हायरल झाल्या होत्या. त्यानंतर आता या 'स्क्रीनशॉट'ची चर्चा रंगली आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: