कल्याणहून लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारी बस उलटली; २० जखमी
अहमदनगर: नगर-जामखेड रस्त्यावर सोमवारी लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या मिनी बसला अपघात झाला. यामध्ये (मुंबई) येथील वीस जण जखमी झाले आहेत. जिल्ह्यातील कडा गावाजवळ हा अपघात झाला. जखमींवर कडा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. जामखेड तालुक्यातील पिंपळगाव येथील विवाह समारंभासाठी कल्याण येथून मिनी बसमधून ( एम.एच. ०५ – डी. के. ६१२५) वऱ्हाड आले होते. विवाह आटोपून रात्री कल्याणकडे परतत असताना कड्याजवळील कर्डिले वस्ती येथे बस पलटी झाली. या अपघातात विघ्नेष श्रावण बनसोडे, मिहीर श्रावण बनसोडे, श्रावण बनसोडे, कवू भगवान कांबळे, चंची श्रावण बनसोडे, शशिकांत जाधव, विलास डाडर, राजाबाई डाडर, सुनील पवार, सुनीता जाधव, अजय जाधव, धोंडबाई जाधव, बाळू कसबे, विराज जाधव, पवन जाधव, कालिंद जाधव, अनिकेत जाधव, कनिराम राठोड व चालक सुनील पवार जखमी झाले आहेत. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पलटी होऊन रस्त्यावर आडवी झाली. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली. अपघातग्रस्त बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी दोन तास लागले. अपघाताची माहिती मिळताच तेथील सरपंच तात्या ढोबळे. संपत सांगळे. गणेश चोरडिया, संभाजी ढोबळे, रघुनाथ कर्डीले, जयेश कदम यांनी मदतीसाठी धाव घेतली. अन्य ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल केले. जखमींवर कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये लहान मुले व महिलांचा समावेश आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: