ठरलं ! 'या' दिवसाचं निमित्त साधून अण्णा हजारे उपोषणाला बसणार
म. टा. प्रतिनिधी, नगर: ज्येष्ठ समाजसेवक यांच्या उपोषणाची तारीख जवळपास नक्की झाली आहे. ३० जानेवारीपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर हजारे बेमुदत उपोषण करणार आहेत. दिल्लीत जागेसाठी अद्याप त्यांना परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे ऐनवेळी राळेगणसिद्धीतच आंदोलन करण्याचेही त्यांनी ठरविले असल्याची माहिती मिळाली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात आंदोलन करण्याचा इशारा हजारे यांनी दिला होता. मात्र, नेमकी तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. आतापर्यंतच्या आंदोलनांचा इतिहास लक्षात घेता हजारे यांनी आपली आंदोलने विशेष दिवसांचे निमित्त साधून सुरू केलेली आहेत. त्यामुळे यावेळीही हजारे ३० जानेवारी या हुतात्मा दिनापासून आंदोलन करतील, अशी शक्यता ‘महाराष्ट्र टाइम्स’ने पूर्वीच वर्तविली होती. आता मिळालेल्या माहितीनुसार हजारे यांनी ही तारीख ठरविली आहे. कृषी मूल्य आयोगाला स्वायतत्ता देणे, स्वामिनाथ आयोगाच्या शिफारशी लागू करून त्यानुसार शेतीमालाच्या किमती ठरविणे या प्रमुख मागण्यांसाठी हजारे यांनी आंदोलन पुकारले आहे. आपल्या आयुष्यातील हे शेवटचे आंदोलन असेल, असा निर्धारही हजारे यांनी व्यक्त केला आहे. आंदोलनासाठी दिल्लीत रामलीला मैदान किंवा अन्यत्र जागा मिळावी, अशी मागणी त्यांनी संबंधित यंत्रणेकडे केली आहे. अनेकदा पत्रव्यवहार करूनही त्यांना उत्तर मिळालेले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या हजारे यांनी केंद्र सरकार आणि संबंधित यंत्रणेवरही टीका केली. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सरकार आपल्याशी सूडबुद्धीने वागत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. त्यानंतर हजारे यांच्याशी चर्चा करण्यासाठी भाजप नेत्यांची धावपळ सुरू झाली आहे. ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे, माजी मंत्री गिरीष महाजन, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी हजारे यांची भेट घेतली आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हेही हजारे यांच्या संपर्कात आहेत. असे असले तरी हजारे यांना अद्याप कोणतेही ठाम अश्वासन देण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांचा आंदोलनाचा निर्णय ठाम आहे. आत त्यांनी तारीखही ठरविली आहे. लवकरच ही तारीख ते सरकारला कळविणार असून दिल्लीत जागा मिळाली नाही, तर राळेगणसिद्धी येथेच यादव बाबा मंदिरात त्यांचे उपोषण होणार आहे. हजारे यांचे इशाऱ्यावर इशारे सुरू आहेत. मात्र, त्यांचा रोख केंद्र सरकारकडेच असल्याने राज्यातील महाविकास आघाडीचे सरकारने मात्र यामध्ये लक्ष घातलेले नाही. मंत्री, पदाधिकारी किंवा सरकारी अधिकाऱ्यांनीही यावर काही भाष्य अगर कृती केलेली नाही. मात्र, दिल्लीत जागा मिळाली नाही, तर हजारे राळेगणसिद्धी येथेच उपोषण केले तर त्यावेळी मात्र, बंदोबस्ताची जबाबदारी स्थानिक प्रशासन आणि राज्य सरकारवरच येणार आहे.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: